नाशिक – कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी सध्या डिझेल आणि गॅसची शवदाहिनी वापरली जात आहे. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात वेटींग असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे अनेक वेळ मृतदेह ताटकळत राहत आहेत. अखेर याची दखल घेत नाशिक महापालिकेने शवदाहिनीसाठी हेल्पलाीईन सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पार्थिवावर नाशिक येथील अमरधाम येथे विद्युत शव दाहिनी व गॅस शवदाहिनीमध्ये अंत्यविधी होत आहेत. अंत्यविधीसाठी योग्य समन्वय होऊन तातडीने मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे असल्याने नाशिक महानगरपालिकेमार्फत हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. अमरधाम येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी अमरधाम समन्वयक मेहबूब शेख- ८०८७९५१८७५ (दिवसपाळी) व संतोष गायकवाड – ९०२२०६९८२२(रात्रपाळी) यांच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर कोरोना कक्ष हेल्पलाईन क्रमांक ०२५३-२३१७२९२ व ९६०७४३२२३३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे. या हेल्पलाईनमुळे नागरिकांना शववाहिका तसेच विद्युत व गॅस शवदाहिनीच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळण्यात मदत होणार आहे.