नाशिक – कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा तीव्र असंतोष लक्षात घेऊन अखेर याप्रकरणी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसमवेत शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे.
आडगाव येथील एमईटी कॉलेजच्या सभागृहात ही बैठक होत आहे. यावेळी पवार म्हणाले की, नागरिकांच्या दैनंदिन खर्चामध्ये कांद्याचा खर्च अतिशय किरकोळ आहे. केंद्राकडे निर्यातबंदी रद्द करण्याचा आग्रह धरावा लागेल. आजच केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधून येत्या २-३ दिवसांत शेतकरी प्रतिनिधींना घेऊन दिल्लीला जाण्याची माझी तयारी आहे. केंद्राच्या धोरणात बदल करण्यासाठी बोलावं लागेल. आजच केंद्रीय मंत्र्यांशी बोलून बैठकीची जागा आणि वेळ ठरवू. मात्र, मार्केट बंद ठेवण्याच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी फेरविचार करावा, असे आवाहन पवार यांनी केले.
या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. केंद्र सरकारचे धोरण आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडी-अडचणी याबाबत शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी ठोस कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पवार हे सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ंयावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र नव्हे तर देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिकमध्ये घेतले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत नाशिकच्या कांद्याला अधिक मागणी असते. त्यामुळे याबाबत काही चुकीचे निर्णय घेतले तर त्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसतो. या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर राज्य शासनासोबतच केंद्राने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की,कांद्याच्या या निर्णयाबाबत राज्य शासनाकडून अपेक्षा करून नये कारण आयात आणि निर्यात धोरण केंद्र शासन ठरवीत असते. केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंची यादी जाहीर केली त्यात कांद्याला वगळण्यात आले. एकीकडे निर्णय घेतला असतांना त्यावर कारवाई करणे हा विरोधाभास असून आहे. हा विषय केंद्र सरकारकडे मांडला जाईल. निर्यात बंदीचा आग्रह धरावा लागेल, आयात आणि साठवणूक मर्यादा याबाबत केंद्र सरकारकडे चर्चा करण्यात येईल. आजच संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधून चर्चा करण्यात येईल. याबाबत व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींना घेऊन बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजे ही आमची कायमच भूमिका आहे. त्यामुळे मार्केट बंद ठेवण्याबाबत व्यापारी वर्गाने फेरनिर्णय घेण्याची आवश्यकता असून बाजार समितीतील प्रश्नांची सोडवणूक आपण करू त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी केंद्र शासनाने कांदा साठवणूक व निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नाफेडने ७०० ते ८०० रुपयांनी खरेदी केलेला कांदा पुन्हा मार्केटला विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या कांदा विक्रीला स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे नाफेडकडे शिल्लक असलेला कांदा रेशनच्या माध्यमातून वाटप करण्यात यावा अशी मागणी शेतकरी प्रतिनिधी हंसराज वडघुले यांच्यासह शेतकऱ्यांनी केल्या.
यावेळी कांदा व्यापाऱ्यांवर रेड टाकून दबावतंत्र निर्माण केले जात असून शेतकऱ्यांना सोबत व्यापारी देखील भरडला जात आहे.माल खरेदीसाठी मर्यादा घातली गेली असल्याने व्यापारी अतिरिक्त खरेदी करू शकणार नाही त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असून व्यापारी देखील अडचणीत सापडला आहे. बाजारपेठा बंद ठेवण्याचा व्यापारी वर्गाचा निर्णय नाही. खरेदीसाठी व्यापारी वर्गावर बंधने घालण्यात येऊ नये व्यापारी आजही खरेदीस तयार असल्याचे व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार डागा यांनी सांगितले.
कांदा निर्यात बंदी उठविण्यात यावी, व्यापाऱ्यांना कांदा खरेदीसाठी घालण्यात आलेली मर्यादा उठविण्यात यावी असे सांगत आयात केलेल्या कांद्याला कुठल्याही मर्यादा घालण्यात आली नाही हे दुटप्पी धोरण असल्याची टीका आमदार दिलीप बनकर यांनी व्यक्त केली.
अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठे नुकसान झालं असून त्यांना मदत देण्यात यावी. मक्याला हमीभाव १८५० असतांना ११०० ते १२०० रुपयांना खरेदी केला जात आहे. यासाठी हसक्षेप योजना राबवून शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यात यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार यांनी केली.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, दिलीप खैरे, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
पाटील कुटुंबियांचे सांत्वन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. सकाळी साडेअकरा वाजता आडगाव येथील एमईटी महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर ते उतरले. त्यानंतर पवार हे माजी मंत्री कै. विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी गेले. येथे त्यांनी विनायकदादा यांच्या कुटुंबीयांची सांतन्वपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कै. विनायकदादांना श्रध्दांजली अर्पण करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर ते पुन्हा एमईटीकडे रवाना झाले. येथे ते शेतक-यांशी संवाद साधणार आहे. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज मसानी आदी उपस्थित होते.