मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावतात आणि ते सर्वांच्या निदर्शनास येते. आताही भारतीय क्रिकेट संघाच्या मदतीला पवार हे धावून आल्याचे स्पष्ट झाले. ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करुन भारतीय संघ आज सकाळी मुंबईत परतला. कोरोना नियमामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींना विमानतळावर उतरल्यानंतर लगेच क्वारंटाईन व्हावे लागते. मात्र, शरद पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, भारतीय संघाला क्वारंटाईनच्या नियमातून सूट दिली जावी. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती तातडीने मान्य केली आणि तसे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. त्यामुळे मुंबई विमानतळावरुन थेट आपल्या घरी जाण्याची मुभा भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंना मिळाली. त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यानंतरच त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. भारतीय संघ लवकरच चेन्नई येथे सामना खेळणार आहे. त्यामुळे थोडा वेळ कुटुंबासमवेत राहता यावे, म्हणून भारतीय संघाला या नियमातून सूट देण्यात आली आहे.