मुंबई ः कोकणातल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविल्यानंतर पवार यांनी राज ठाकरे यांना फोन केला आहे. नाणार प्रकल्पाबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहोत असं शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला. कृष्णकुंज या राज यांच्या निवसस्थानी जमलेल्या नाणार प्रकल्पाच्या समर्थकांना राज यांनी ही माहिती दिली.
या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याचं राज यांनी सांगितलं. हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी प्रकल्प समर्थकांनी राज यांच्याकडे केली आहे. या घडामोडींमुळे नाणार प्रकल्पाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
...तर शिवसेनेचे नेतेही पाठिंबा देतील
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं. शिवसेनेच्या नेत्यांना मोकळेपणानं बोलण्याची संधी दिली तर ते देखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाणारबाबत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, आम्ही त्याचे स्वागत करतो, असं फडणवीस यांनी सांगितलं. मला राज ठाकरे यांचं पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. हे हरित शुद्धीकरण केंद्र असेल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.