नवी दिल्ली – मशीनने आपली अनेक कामं सोपी झाली असं आपण म्हणतो. पण, शेवटी मशीन ते मशीनच. आखून दिलेल्या मार्गावर चालणं, दिलेल्या सूचना केवळ फॉलो करणं हेच त्याचं काम. याचाच मग अनेकदा फटका बसतो. आयआयटी दिल्लीच्या संचालकांनाही असाच एक फटका बसला आणि त्यांचा फेसबुक अकाऊंट तब्बल ४८ तास ब्लॉक झाला.
कोरोना काळात जे काही रिसर्च अहवाल प्रसिद्ध करण्यात आले, त्यात जगात भारताचा तिसरा क्रमांक आहे, अशी माहिती आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा. रामगोपाल राव यांनी फेसबुक वॉलवर टाकली. यात दरवर्षी पेटंटच्या संख्येत कशी वाढ होते आहे, याबाबतही माहिती देण्यात आली होती. पण, फेसबुकच्या मशीन लर्निंग यंत्रणेला पेटंट आणि पेशंटमधील फरकच लक्षात आला नाही. आणि प्रा. राव पेशंटबद्दल फेसबुकवर काही लिहित आहेत, असे त्यांना वाटले. आणि प्रा. राव कोरोनासंबंधी काही अफवा पसरवत आहेत असे त्यांना वाटले. या यंत्रणेच्या ऑटोमेटिक नियंत्रणानुसार त्यांचा अकाऊंट चक्क ब्लॉक झाला. ४८ तासांनी जेव्हा फेसबुक व्यवस्थापनाला याची माहिती मिळाली, तेव्हाा हा अकाऊंट अनब्लॉक करण्यात आला.
विज्ञानातील नवनवीन शोध, रिसर्च पेपर, नवीन संकल्पना यांसंबंधात प्रा. राव नेहमीच आपले विद्यार्थी, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्यासोबत सोशल मीडियावर चर्चा करत असतात. कोरोना काळात भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामुळे चीन आणि अमेरिकेनंतर आता भारताचा नंबर लागला आहे. आपल्या या लेखात प्रा. राव यांनी पेटंटला ट्विटरमधील भाषेच्या अनुषंगाने पेटंटला आयपी असे संबोधले. आणि तिथेच सगळा घोळ झाला. या आयपीला मशिन लर्निंग यंत्रणा पेशंट समजली. आणि पुढचा सगळा किस्सा घडला.