नाशिक – शहरात चेनस्नॅचिंगचे सत्र सुरूच आहे. शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) सायंकाळी काठेगल्ली परिसरात घडली. याप्रकरणी ज्योती महेंद्र ठाकूर (रा. बनकर चौक, विद्या विहार सोसायटी, काठेगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्योती ठाकूर या मंगळवारी सायंकाळी त्रिकोणी गार्डन परिसरात वॉकिंग करत होत्या. यावेळी समोरून आलेल्या अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओरबाडुन नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरिक्षक ए. जी. मुगले अधिक तपास करत आहे.
—
टोळक्याची एकास मारहाण
नाशिक – सातपूर येथील भवर मळा परिसरात टोळक्याने एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन दंगा करू नका व येथून निघून जा, असे सांगितल्याचा राग आल्याने ८ ते १० जणांनी एकास बेदम मारहाण केली. दगडफेक व परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी घडली. भूषण आव्हाड, चेतन पवार, तेजस पाटील, जयतू चित्ते, राजेश चव्हाण व इतर चार ते पाच जण (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम नामदेव भवर (२४, रा. महात्मा नगर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दारू पिऊन दंगा करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादी शुभला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांना देखील संशयितांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच दगडफेक करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—
दुचाकीची चोरी
नाशिक – घराजवळ पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड परिसरातील शिवसृष्टी कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी सुनील गोविंदराव मराठे ( रा. पाचोरा, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मराठे यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १९ एझेड ८९७३) गंगापूर रोडवरील शिवसृष्टी कॉलनी येथे पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची ही मोटारसायल चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—
विद्युत मोटारीची चोरी
नाशिक – विहीरीतून जलपरी मोटार चोरीला गेल्याची घटना एकलहरारोड परिसरात घडली. याप्रकरणी सुभाष हरिभाऊ सहाणे ( ४१, रा. डायमंड नगर, आर्टलरी सेंटर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १६ ते २० सप्टेबर दरम्यान अज्ञात चोरट्याने सहाणे यांच्या विहीरीतून जलपरी मोटार चोरून नेली. यात सहाणे यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पी. के. वाघ तपास करत आहे.