नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप पेमेंट ही सुविधा भारतात नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपवर अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. व्हॉट्सअॅप पेमेंट ही यूपीआयवर आधारित मनी ट्रान्सफर सर्व्हिस आहे, जी भारतातील अन्य यूपीआय आधारित पेमेंट सेवेप्रमाणे कार्य करते. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या करारा अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. मात्र, व्हॉट्सअॅप पेमेंट वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे बँकिंग फसवणूकीला आळा बसेल.
व्हॉट्सअॅपचे अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक नाही
व्हॉट्सअॅप पेमेंटचा कोणताही अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक नाही. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप कस्टमर केअरच्या रूपात येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका. पेमेंटसंबंधी कोणतीही गैरसोय होत असल्यास ग्राहकाने त्वरित संबंधित बँकेशी संपर्क साधावा.
यूपीआय पिन सामायिक करू नका
व्हॉट्सअॅप कधीही ग्राहकांकडून कार्ड तपशील, ओटीपी व यूपीआय पिनचा तपशील विचारत नाही. अशा परिस्थितीत, एखाद्याने व्हॉट्सअॅपशी संबंधित माहिती मागितल्यास कोणतीही माहिती देऊ नका. फसवणूक होण्यापासून खबरदारी म्हणून ग्राहकांनी या खासगी कोणाबरोबरही शेअर करू नयेत.
अज्ञात लिंकवर क्लिक करू नका
व्हॉट्सअॅपवरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. बर्याच वेळा, हॅकर्सद्वारे मजकूर किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लिंक प्रसारित केली जाते त्याद्वारे फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत ग्राहकाने कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
परिचितांकडून पैसे स्वीकारा
व्हॉट्सअॅपवर कोणत्याही परिचित लोकांकडून पेमेंट स्वीकारा. व्हॉट्सअॅपद्वारे असे म्हटले गेले आहे की, आपणास पेमेंटची विनंती मिळाली तर त्याची पडताळणी करा. अनोळखी तसेच इतर कोणत्याही क्रमांकावरून येणारे पैसे स्वीकारू नका.
पेमेंट कन्फर्म करा
कोणालाही व्हॉट्सअॅपवरुन पेमेंट पाठवत असल्यास नेहमी पेमेंट पाठवण्यापूर्वी आणि पेमेंट पाठवल्यानंतर त्याची पडताळणी करा. व्हॉट्सअॅपनुसार यूपीआय आधारित पेमेंट सर्व्हिसच्या देयकापूर्वी आणि नंतर कॉलद्वारे कन्फर्म करा.