मुंबई – व्हॉट्सअॅप हे भारताचे सर्वाधिक लोकप्रिय असे मेसेजिंग अॅप आहे. अनेक सरकारी आणि खाजगी संस्था याचा उपयोग करून आपल्या ग्राहकांशी संपर्क करत असतात. मात्र आजपर्यंत रेल्वे विभागातर्फे अशी काही सेवा मिळत नव्हती. आता भारतीय रेल्वेशी संबंधित माहितीसुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहणे शक्य झालेले आहे. यासाठी युजर्सना रेलोफाय नावाच्या एका फिचरची मदत घ्यावी लागणार आहे. हे फिचर रिअल टाईम पी.एन.आर. स्टेट्स, आणि ट्रेन यात्रा इत्यादींची माहिती व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय प्रवासाला लागणारा वेळ, गाडी उशिरा येणार असल्यास त्याचा अलर्ट, स्टेशन अलर्ट इत्यादी माहिती यावरून मिळणार आहे.
मिळणार या सर्व सुविधा
आतापर्यंत आपल्याला रेल्वे संबंधी माहिती हवी असल्यास वेगवेगळ्या वेबसाईटस वर जावे लागत असे. मात्र रेलोफायच्या (Railofy) माध्यमातून रेल्वेची सगळीच माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे ट्रेन मध्ये प्रवासात असताना पुढे येणारे स्टेशन कोणते असणार आहे, याबद्दल अनेकांना माहिती हवी असते. एका आकडेवारीनुसार दर महिन्याला जवळपास ६० लाख यात्री पुढील स्टेशन बद्दलची माहिती आय.आर.सी.टी.सी.च्या वेबसाईटवर गुगलच्या माध्यमातून सर्च करतात. ही माहिती आता आपल्या व्हॉट्सअप् नंबर वरच मिळणे शक्य होणार आहे.
संपूर्ण प्रोसेस अशी आहे
सर्वप्रथम आपले व्हॉट्सअॅप अपडेट करा. यानंतर आपल्या फोन मध्ये ट्रेन इन्क्वायरी नंबर म्हणून +91-9881193322 का क्रमांक सेव्ह करा. आपण ट्रेन इन्क्वायरी नंबर या नावाने प्रस्तुत क्रमांक सेव्ह केल्यामुळे आपल्या व्हॉट्सअॅप लिस्ट मध्ये हा नम्बर दिसू लागेल. आता न्यू मेसेजची विंडो ओपन करून हा नंबर सर्च करून आपल्या व्हॉट्सअॅप माध्यमातून या नंबर वर आपल्याला आपला पी.एन.आर. नंबर मेसेज करायचा आहे. असे केल्यानंतर तुमचा पी.एन.आर. नंबर थेट रेल्वे विभागाला जाईल आणि त्यानंतर त्या पी.एन.आर. मध्ये झालेल्या प्रत्येक बदलाची माहिती तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळत राहील.