नवी दिल्ली – व्हाट्सऍपची प्रायव्हसी पॉलिसी आणि ती ऍक्सेप्ट न केल्यास अकाऊंट डिलीट होण्याच्या तरतुदीनंतर सिग्नल मेसेजिंग ऍपचा पर्याय समोर आला होता. व्हाट्सऍपच्या या पॉलिसीचा विरोध करण्यासाठी अनेकांनी हे ऍप डाउनलोड केले. पण या सगळ्यात सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर ते आहे टेलिग्राम ऍप. जानेवारी 2021 मध्ये हे ऍप सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर 2020 मध्ये टिक टॉक हे ऍप सर्वाधिक डाऊनलोड झाले होते आणि टॉप 5 मोस्ट डाऊनलोडिंगच्या यादीत टेलिग्रामचा समावेशही नव्हता. या पार्श्वभूमीवर टेलिग्रामने मारलेली ही मुसंडी कौतुकास्पद आहे.
सर्वाधिक डाऊनलोडिंग भारतात
सेन्सर टॉवरने यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात टेलिग्राम भारतात मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आल्याचे दिसते. तर जगभरात हे ऍप 63 दशलक्षवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. यातील जवळपास दीड कोटी म्हणजेच 24 टक्के डाऊनलोडिंग हे केेवळ भारतात झाले आहे.
टेलिग्राम हिट
व्हाट्सऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरून झालेल्या गोंधळामुळे टेलिग्रामचा वापर वाढला आहे. सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍप्सच्या यादीत आता टिकटॉक दुसऱ्या नंबरवर आहे. तर खूप कमी फरकासह फेसबुक आणि सिग्नल अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. प्रायव्हसीचा फटका बसलेले व्हाट्सऍप पाचव्या क्रमांकावर आहे.