नवी दिल्ली – मेड इन इंडिया व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीसंबंधीचा प्रस्ताव कोविड १९ संबंधी मंत्रीसमूहाने (जीओएम) आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्वीकारला असून, त्यास मंजुरी दिली आहे. स्वदेशात निर्मित व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीसंबंधी पुढील कार्यवाहीसाठी हा निर्णय विदेश व्यापार महासंचालकांना कळवण्यात आला आहे.
भारतातील कोविड १९ रुग्णांचा सातत्याने घटता मृत्यूदर पाहता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मृत्यूदर २.१५टक्के आहे, म्हणजे फार कमी सक्रिय रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ३१ जुलै रोजी देशभरात सक्रिय रुग्णांपैकी केवळ ०.२२टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याव्यतिरिक्त, व्हेंटिलेटरच्या घरगुती उत्पादन क्षमतेतही भरीव वाढ झाली आहे. जानेवारीच्या तुलनेत सध्या २० पेक्षा अधिक घरगुती व्हेंटिलेटर उत्पादक आहेत. कोविड १९ चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मार्चमध्ये व्हेंटिलेटर निर्यातीवर प्रतिबंध / निर्बंध घालण्यात आले होते. २४ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या डिजीएफटी आदेश क्रमांक ५३ अन्वये सर्व प्रकारच्या व्हेंटिलेटर निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. आता व्हेंटिलेटरच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे आशा आहे की, भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर परदेशात नवीन बाजारपेठ शोधू शकतील.