मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या पत्नी अर्थात अमेरिकेच्या प्रथम महिला डॉ. जिल बायडन यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी व्हाईट हाऊसच्या लॉनला ह्रदयाच्या आकाराच्या शुभेच्छा पत्रांनी सजविले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत डॉ. जिल देखील माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांना व्हॅलेंटाईन डे च्या तयारीविषयी विचारण्यात आले. बायडन यांनी हा दिवस मोठा आहे आणि जिलचा सर्वांत आवडता दिवस आहे, असे उत्तर दिले.
डॉ. जिल बायडन यांनीही माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कश्यामुळे त्यांना सजावट करण्याची प्रेरणा मिळाली याबाबतही त्यांनी माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष बायडन आणि त्यांच्या पत्नीसोबत यावेळी त्यांचे पाळीव कुत्रे चॅम्पियन आणि मेजर देखील उपस्थित होते. जिल म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण निराश आहे. अशात थोडा आनंद पेरण्याचा माझा प्रयत्न आहे. यातून एक आशा आणि विश्वास निर्माण व्हावा, एवढाच उद्देश आहे.
त्यानंतर एका ट्वीटच्या माध्यमातून डॉ. जिल यांनी व्हाईट हाऊसच्या सजावटीची छायाचित्रे पोस्ट केली आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी ‘शौर्य, प्रेम, करुणा कृतज्ञता, शांती, शक्ती, दया, कुटुंब, एकता’ असे कॅप्शन दिले आहे. गेल्या महिन्यात बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. जिल यांनी एक ट्वीट केले होते. ‘दर चार वर्षांनी आपण एक नवे प्रशासन सुरू करण्याचा उत्सव साजरा करतो. ही एका उज्ज्वल अध्यायाची सुरुवात आहे. हा आपल्यासाठी एकत्र येण्याचा काळ आहे. आजचा हा अविश्वसनीय दिवस उजाडण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांची मी आभारी आहे. विशेषतः या अत्यंत कठीण काळात त्यांनी कष्ट घेतले याबद्दल विशेष आभारी आहे.’