मुंबई – ‘We are committed to your privacy’ म्हणजेच ‘आम्ही तुमची गोपनीयता जपण्यास बांधील आहोत’ अशी ग्वाही देणारे स्टेटस खुद्द व्हाॕट्सअपनेच आता आपल्या युजर्सच्या खात्यावर अपडेट केले आहे. विशेष म्हणजे हे स्टेटस एकदा बघितले की परत दिसत नाही. इतर स्टेटस २४ तास असतात. पण,व्हाॕट्सअपने असे करण्यामागचे कारण मात्र युसर्जना पुन्हा कोड्यात पाडते. व्हाॕट्सअपने प्रायव्हसी पॉलिसीत बदल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरची जी पडझड सुरू झाली होती तिला डागडुजी करण्याचा हा प्रयत्न असला तरी या अॅपवरची विश्वासार्हता मात्र कमी झाली आहे.
व्हाॕट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी बदल करायचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली. आपली गोपनीय माहिती सार्वजनिक होणार या भीतीने व्हाॕट्सअप वर अहोरात्र प्रेम करणाऱ्या नेटिझन्सनी व्हाॕट्सअप सोडायचा निर्णय घेतला. या अॕपच्या तुलनेत किंवा समकक्ष असलेल्या इतर ॲप्सला पसंतीही दिली जाऊ लागली. मग व्हाॕट्सअपची झोप उडाली त्यांनी प्रायव्हसी किंवा गोपनीयते बाबतचे नवीन प्रस्तावित धोरण तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
व्हाॕट्सअप स्टेट्स हे फिचर युजर्सचा सगळ्यात आवडीचा भाग आहे. आणि ते बहुसंख्य युजर्सकडून हमखास बघितले जाते. म्हणून त्यांनी आता प्रत्येकाच्या स्टेटसवर स्वतःचे नवे असे चार स्टेट्स पाठवले असून त्यामध्ये व्हाॕट्सअप युजरला अशी माहिती देण्यात आली आहे की, तुमची गोपनीय माहिती ते कुठेही शेअर करणार नाहीत, तुमचं लोकेशन तुमचे कॉन्टॅक्ट कोणाशीही शेअर केले जाणार नाहीत आणि तुमच्या माहीतीविषयी संपुर्ण गोपनियता पाळली जाईल. आता व्हाॕट्सअपने दिलेले हे वचन खरोखर पाळले जाईल की आणि नाही ? यावर विश्वास ठेवायचा की अविश्वास दाखवायचा ?
हे युजर्सच्या हाती आहे.