नवी दिल्ली – व्हाट्सऍपद्वारे पेमेंट करण्याचे एक नवीन फीचर व्हाट्सऍपने नुकतेच आणले आहे. पण या माध्यमातून जे व्यवहार केले जातील, त्याच्या माहितीची सुरक्षा काय, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.
व्हाट्सऍपच्या माध्यमातून जे काही व्यवहार होतील, त्याचे यूपीआय डिटेल्स फेसबुक किंवा अन्य कोणालाही दिले जाणार नाहीत, याची काळजी व्हाट्सऍपने घ्यायला हवी. तसेच या व्यवहारांसाठी आरबीआय आणि एनपीसीआयने जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत, त्याचे पालन करणे, हे देखील व्हाट्सऍपचे काम असल्याचे, न्यायालयाचे म्हणणे आहे.
न्या. एस. बोबडे, न्या. ए. बोपन्ना, आणि न्या. रामसुब्रह्मण्यम यांच्या बेंचने या प्रकरणी आपले मत नोंदवले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार बिनॉय विश्वम यांनी या प्रकरणी एक याचिका दाखल केली होती, त्याच्या सुनावणी दरम्यान ते बोलत होते.
तसेच व्हाट्सऍप, फेसबुक, अमेझॉन प्राईम, गुगल पे आणि केंद्र सरकारने या प्रकरणी आपले मत ४ आठवड्यांत मांडायचे आहे. विश्वम यांनी ही याचिका दाखल करतानाच यूपीआय सुविधेचा गैरवापर होऊ नये यासाठी काही तरतूद करण्याची मागणी केली आहे.