मुंबई – मुली असलेल्या पालकांसाठी सुकन्या समृद्धी ही एक अत्यंत फायदेशीर बचत योजना आहे. मुलीच्या भविष्यासाठी आई-वडील यांत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा व्याजदर ७.६ टक्के आहे. त्यामुळे मुदत संपल्यावर चांगली रक्कम हाती पडते. मात्र, पोस्टातून तुम्ही ही योजना घेतली असेल तर त्याचे पैसे देण्यासाठी अनेकदा पोस्टात खेपा घालाव्या लागतात. हे टाळण्यासाठी आज आम्ही यात ऑनलाइन पैसे कसे भरता येतील हे सांगणार आहोत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) माध्यमातून तुम्ही ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करू शकता. तुमच्या बँक खात्यातून आयपीपीबी खात्यात पैसे टाका. मग डिओपी उत्पादनांचा पर्याय निवडा. सुकन्या समृद्धी योजना निवडा. आपला सुकन्या समृद्धीचा खाते क्रमांक आणि डिओपी ग्राहक आयडी टाका. किती पैसे टाकायचे आहेत आणि कोणत्या काळासाठी ते देखील टाका. पैसे ट्रान्स्फर झाले की आयपीपीबीच्या मोबाइल ऍपद्वारे आपल्याला याची माहिती मिळते.
सुकन्या समृद्धी योजनेचा अकाऊंट बॅलन्स देखील ऑनलाइन पाहू शकता. तुम्ही ज्या बँकेतून खाते उघडले आहे, त्या बँकेत अर्ज करून लॉग इनची माहिती घ्या. ही माहिती मिळाल्यावर संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करा. तेथे जाऊन तुम्ही बॅलन्स पाहू शकता. याशिवाय कोणताही व्यवहार तुम्हाला तेथे करता येणार नाही. दरम्यान, काहीच बँकांनी ही बॅलन्स पाहण्याची सेवा दिली आहे.