इंदूर – कोरोना किंवा पोलिओ रोगाच्या लसींच्या वाहतुकीमध्ये तापमान नियंत्रण करणे सर्वात मोठे आव्हान असते. परंतु इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) तापमान नियंत्रित ठेवून दुर्गम खेड्यात किंवा लसीकरण केंद्रात लस वाहतुकीसाठी एक बॉक्स तयार केला आहे. त्यामुळे विना बर्फ लसीची वाहतूक शक्य असून त्याला ‘स्वयंपूर्ण लस वाहक’ असे नाव देण्यात आले आहे. सुमारे सहा किलो वजनाच्या पेटीत कोठेही ही लस नेणे शक्य होते.
आयआयटी इंदूरचे वरिष्ठ आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा राऊत यांनी संगणक प्रणालीद्वारे कार्य करणारे एक स्वतंत्र लस वाहक बॉक्स विकसित केला आहे. यासाठी एक वर्ष संशोधन चालू होते. बर्फ न वापरता लसीसाठी आवश्यक तापमान नियंत्रित करण्याची सुविधा या बॉक्समध्ये आहे.
डॉ. राऊत यांच्या मते, लस वाहतूकीसाठी आतापर्यंत लस बॉक्स इन्सुलेटेड कंटेनर आणि आईस पॅक वापरत असत. मात्र आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बर्फ वितळल्यामुळे लसीकरण पूर्ण करण्यापूर्वी दुर्गम भागातून परत यावे लागले होते. तापमान नियंत्रित न केल्यास लस देखील खराब होते. लस बॉक्स हे थर्माइलेक्ट्रॉनिक कूलरने थंड राहतात. वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या लहान कोरड्या बॅटरीमुळे त्यांना उर्जा मिळते. त्याचे तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवले जाऊ शकते. देशातील असमान तापमानात लस सुरक्षित ठेवल्या जातात आणि त्याची वाहतूक केली जाते.