मुंबई – लहान मुलांसाठी खेळणे तयार करण्यासाठी अस्सल भारतीय कल्पना सुचविणाऱ्यांना आता लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याची कल्पना निवडली गेली तर त्यांना ५० लाख रुपयांपर्यंतची बक्षीसे जिंकता येणार आहेत.
आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने टॉकेथान-२०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील सहभागी होऊ शकणार आहेत. विदेशी खेळण्यांच्या एवजी स्वदेशी खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा उत्तम मार्ग असल्याची शिक्षण विभागाची भावना आहे. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या उद्योगांनाही प्रोत्साहन मिळेल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. २० जानेवारीपर्यंत आपली कल्पना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पोर्टलवर द्यायची आहे. सीबीएसई विद्यार्थ्यांसाठीदेखील ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बोर्डाचे शिक्षक व विद्यार्थी टॉकेथान स्पर्धेच्या माध्यमातून नॅशनल टॉय फेअरमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. यात आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.
हे असतील विषय
वैदिक गणित, शारीरिक व मानसिक आरोग्य, दिव्यांगासाठी उपयुक्त खेळणी, गणित-विज्ञान व भाषांची माहिती देणारी खेळणी, स्वच्छ भारत, पर्यावरण, बेटी बचाओ बेटी पढाओ, भारतीय संस्कृती, परंपरा, सांस्कृतिक वैविध्य या विषयांवर कल्पना सुचवाव्या असे मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. १२ फेब्रुवारीला विजेत्यांची घोषणा होईल.