मुंबई – जिद्द आणि चिकाटीपुढे प्रत्येक संकट थिटे आहे. याची प्रचिती देणाऱ्या अनेक कहाण्या आजवर आपण ऐकत आलोय. अनेकदा या कहाण्या एेकूऩ आपल्याला आश्चर्याचा धक्काही बसतो. अशीच एक घटना पश्चिम आफ्रिकेतील घानामध्ये राहणाऱ्या 18 वर्षाच्या तरुणाच्या निमित्ताने पुढे आली आहे. केल्व्हीन नावाच्या या तरुणाने लहानश्या वयात भंगार वापरून एक कार बनविली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या आसपासच्या परिसरात तो या कारनेच फिरतो.
ऐकायला हे फार सोपे वाटत असले तरीही भंगार एकत्र करून कार तयार करणे प्रत्यक्ष फार अवघड काम आहे. मात्र या तरुणाने ते करून दाखविले. ना तो इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे ना त्याने या तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण घेतले आहे.
केल्व्हीनला स्थानिक लोक एलन मस्कच्या नावाने संबोधतात. जुस्तजू हो दिल में तो सफर खत्म कहां होता है, यूं तो हर मोड पर मंजिल का गुमान होता है… या ओळी केल्व्हीनला अगदी तंतोतंद लागू पडतात. कुठलेही शिक्षण किंवा कुणाची मदत न घेता जंक यार्ड, कन्स्ट्रक्शन साईट्स आणि जागोजागी पडलेले भंगार त्याने कारसाठी गोला केले.
त्यातून कारची बॉडी तयार करणे त्याचे सर्वांत पहिले लक्ष्य होते. हे तरी सोपे होते, मात्र आता पुढे कारचे इंजिनही सर्वांत मोठे आव्हान होते. या इंजिनची किंमत बघितली तर ती त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या कमाईपेक्षा जास्त होती. त्यासाठी केल्व्हीनने पार्ट टाईम नोकरी केली. त्यातून आलेल्या पैश्यात त्याने इंजिन खरेदी केले.
हे इंजिन कारमध्ये फिट केले आणि आज घानातील ज्या भागात तो वास्तव्याला आला त्या ठिकाणी त्याची कार म्हणजे त्याची शान आहे. कार बनवायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या कुटुंबात त्या अभ्यासावरून वाद होऊ लागले होते. मात्र आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव होती, असे तो या व्हिडीयोत सांगताना दिसतोय.
बाळाचे पाय पाळण्यात
गेल्या काही दिवसांपासून केल्व्हीनचा एक व्हिडीयो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात तो आपल्याला लहानपणापासूनच इंजिनियर होण्याची इच्छा होती, असे सांगताना दिसतोय. मात्र दारिद्र्यामुळे ते शक्य होणार नव्हते, असेही तो म्हणतो. अर्थात हे दारिद्र्य त्याच्या प्रतिभेला रोखू शकले नाही. दहा वर्षांचा असतानाच त्याने भंगारातून रोबोट, खेळण्यातील विमान, व्हॅक्यूम क्लिनर आदी गोष्टी तयार केल्या होत्या.
कारच्या दुकानात जायचा
15 वर्षाचा असताना त्याने कार बनवायला सुरुवात केली. त्यापूर्वी तो चार वर्षे कारच्या दुकानात जाऊन निरीक्षण करायचा. कारचे डिझाईन, इंजिन कसे काम करते आदी गोष्टी त्याने समजून घेतल्या. त्यावेळी आसपासचे लोक माझ्यावर खूप हसायचे, एवढेच नव्हे तर मला त्यांनी पागलही ठरवून टाकले होते, असे केल्व्हीन सांगतो. मात्र तीन वर्षांत त्याने कार तयार केली. केल्व्हीनच्या कारचे दरवाजे फरारीप्रमाणे वरच्या बाजुने उघडतात. याशिवाय या कारचा वेगही चांगला आहे. तो घराबाहेर पडला की त्याच्या कारसोबत लोक फोटो काढताना दिसतात.