नवी दिल्ली – देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट होत आहे. शिवाय जास्तीत जास्त रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. लसीकरण अभियानही वेगानं सुरू आहे. त्यामुळे उपचार घेणार्या सक्रिय रुग्णांमध्येही घट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी सांगितलं की, देशात ४७ जिल्ह्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. २५१ जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
लसीकरण अभियानाला वेग
देशात लसीकरण अभियान वेगानं सुरू असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या १९ दिवसांत ४४,४९,५५२ नागरिकांना कोविड लस देण्यात आली आहे. भारतात १८ दिवसांत ४० लाख लस देणारा जगातील सर्वात वेगानं लसीकरण करणारा देश ठरला आहे. अनेक देशांना लसीकरण करण्यास ६५ दिवस लागले होते. भारतात १६ जानेवारीला कोरोना लसीकरण देशव्यापी अभियानाला सुरवात झाली होती.
केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्ण अधिक
देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,५५,००० असून, संसर्गाच प्रमाण १.४४ टक्के एवढं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. कोविडमुळे आतापर्यंत १,५४,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १९,९०,००,००० नमुन्यांचे परीक्षण झाले आहे. सध्या पॉझिटिव्ह दर ५.४२ टक्के आहे. केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही अधिक आहे. दोन्ही राज्यात ७० टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
२४ तासात ३,१०,६०४ नागरिकांना लसीकरण
गेल्या २४ तासात देशात एकूण ८,०४१ सत्रात ३,१०,६०४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात लसीकरणाचे एकूण ८४,६१७ सत्र आयोजित केले आहेत. सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात महामारीतून बरे होण्याचं प्रमाण ८६.०४ टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सर्वात अधिक ७,०३० नागरिकांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. तर केरळमध्येही बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. एकूण ६,३८० नागरिकांनी गेल्या २४ तासात कोरोनावर मात केली आहे. तमिळनाडूमध्ये ५३३ रुग्ण एका दिवसात बरे झाले.
४७ जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण नाही
देशात ४७ जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले नाही. देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण १.८२ टक्के आहे. गेल्या १९ दिवसांत संसर्गाचा दर २ टक्क्यांवर कायम आहे. कोरोनावर मात करणार्या नागरिकांची संख्या १,०४,८०,४५५ इतकी आहे. देशातील बरे होण्याचा दर ९७.१३ टक्के आहे. कोरोनातून मुक्त होणारार्यांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ६७.६ टक्के अधिक आहे.
केरळमध्ये कोरोनासंसर्गाचे सर्वाधिक नवे रुग्ण
सध्याच्या परिस्थितीत केरळमध्ये संसर्गाचे नवे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ६,३५६ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात २,९९२ रुग्ण तर तमिळनाडूमध्ये ५१४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात सर्वाधिक ३० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये २० तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमध्ये अनुक्रमे ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.