नवी दिल्ली – देशातील अनेक जिल्हे कोरोनामुक्त होऊ लागले आहेत. आतापर्यंत १९१ जिल्ह्यांनी कोरोनावर मात केली आहे. या ठिकाणी सात किंवा त्यापेक्षा जास्त दिवस कोरोनाचे कोणतेही नवीन रुग्ण आढळून आलेले नाहीत. अवघ्या ११ दिवसांत कोरोना लसीकरणात जगातील देशांमध्ये भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत दिली आहे.
हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात एकूण १४६ जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून नवे कोरोनाबाधित आढळून आलेले नाहीत. तर, गेल्या २१ दिवसांपासून सहा जिल्ह्यांमध्ये आणि २१ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत नवीन रुग्ण दिसलेले नाहीत. कोरोनाची जवळपास दोन तृतीयांश नवीन प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रातच मर्यादित आहेत.
लसीकरणाला वेग
कोरोना बाधितांमध्ये घट झाल्याने भारतात लसीकरणालाही वेग आला आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या ११ दिवसांत २८ लाख आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात भारत यशस्वी झाला आहे. असे नियोजन पूर्ण करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. भारतात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली, तर इतर देशात मागील वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण करीत आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेच्या गतीचा अंदाज फक्त सहा दिवसातच दहा लाख लोकांना लसी देण्यावरून येऊ शकतो.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ओडिशा, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेशात लसीकरणात चांगली कामगिरी झाली. या राज्यांत ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचार्यांना लसी देण्यात आली होती. तामिळनाडू, दिल्ली, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, महाराष्ट्रात २१ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण करण्यात आले आहे.