निलेश गौतम, डांगसौंदाणे (सटाणा)
जनतेच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी बागलाण महसूल विभागाने आता ”जस्ट डायल” हा स्वतंत्र व्हॉटसॲप नंबर जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल विभागातील तक्रारी निकाली काढतानाच सर्वसामान्यांना वेळेत सेवा मिळावी, यासाठी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी जस्ट डायल ही अनोखी संकल्पना समोर आणली आहे. बागलाण महसूल विभागातील मंडळ (सर्कल) कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, प्रांत कार्यालय या ठिकाणी अर्ज केल्यानंतर त्याची वेळेत अंमलबजावणी होणार आहे. ती न झाल्यास तक्रार करण्यासाठी व्हॉटसॲप नंबर जाहीर करण्यात आला आहे. ९४२१५५०८९३ या व्हॉटसॲप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यामुळे संबंधित अर्ज व तक्रारीचा संदर्भ तक्रारदाराला द्यावा लागणार आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे यांनी निर्देश दिले आहेत. यासाठी उपविभागीय प्रांत कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे भांगरे यांनी सांगितले आहे.
त्या तक्रारींना संधी नाही
या क्रमांकावर फक्त जुन्याच तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे. नव्याने असलेली तक्रार ही सबंधित तक्रार नंबरवर टाकता येणार नाही. काही कागदपत्रांची अपुर्तता असेल तर संबधित अर्जधारकाने पूर्ण करावयाच्या आहेत. या उपक्रमामुळे महसूल विभागातील सर्वसामन्य जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.