नगवाई (हिमाचल प्रदेश) ः आता धुक्यामुळे बोगद्यांमध्ये अपघात होणार नाहीत. वाहनांतून निघणारा धूर बोगद्यामध्ये साचून अस्पष्ट दिसते. ही अस्पष्टता दूर करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधल्या मंडी जिल्ह्यातील नगवाईच्या शासकीय महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थ्याने अनोखा विज्ञान प्रकल्प तयार केला आहे.
हरिश चव्हाण असं विद्यार्थ्याचं नाव आहे. हरिशने तयार केलेल्या या प्रकल्पाची प्रथम इंडियन चिल्ड्रन काँग्रेसमध्ये आणि नंतर इंडो-यूएसच्या रिकोमध्ये निवड झाली. या प्रकल्पावर भारत आणि अमेरिकेतले तज्ज्ञ मिळून अभ्यास करणार आहेत. त्यानंतर या तंत्रज्ञानाला विकसित करून मोठा प्रकल्प तयार करणार आहेत. १ ते ३ जानेवारीपर्यंत झालेल्या आयआरआयएस या राष्ट्रीय ऑनलाइन प्रदर्शनातही हा प्रकल्प ठेवण्यात आला होता. या प्रकल्पाची निवड झाल्याची माहिती महाविद्यालय व्यवस्थापनाला मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य रहमत अली आणि गाइड प्राध्यापक पंकज वर्मा यांनी याला दुजोरा दिला.
