नवी दिल्ली – मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ट्विटरनं भारतात एका विशेष फिचरची सुरुवात केली आहे. ट्विटरवर आता वापरकर्ते ऑडिओ मॅसेजही पाठवू शकणार आहेत. भारतीय युजर्सना डायरेक्ट मेसेज (DM) मध्ये व्हॉईस मॅसेज पाठवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या या फिचरचं परीक्षण सुरू असून, हळूहळू युजर्सना उपलब्ध करू देण्यात येईल. भारताच्या आधी ब्राझील आणि जापानमध्ये या फिचरची सुरुवात झाली आहे. ही सुविधा मिळणार्यांच्या यादीत भारत तिसरा देश आहे.
नव्या फिचरमध्ये काय आहे
या फिचरद्वारे युजर्सना टेक्स्टसह ऑडिओ मॅसेज पाठवता येईल. १४० सेकंदांपर्यंतचा ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवता येऊ शकेल. विशेष म्हणजे ऑडिओ मॅसेज फक्त आणि फक्त मोबाईल अॅपद्वारेच पाठवता येऊ शकणार आहे. जर डेस्कटॉपवर ट्विटरचा वापर करत असाल तर हे फिचर वापरता येणार नाही. परंतु ऑडिओ मॅसेज ऐकण्यासाठी अॅप हवंच असं नाही. मॅसेज ऐकण्यासाठी प्ले आणि पॉजचा पर्याय देण्यात आला आहे.
फिचरचा दुरुपयोग टाळण्यासाठी युजर्सना ऑडिओ मॅसेज रिपोर्ट करण्याचा पर्याय मिळणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रथमच ऑडिओ मॅसेज फिचरची घोषणा ट्विटरनं केली होती. स्वतःला व्यक्त करण्यासाठी हा नवा पर्याय आहे. याद्वारे कोणाचाही आवाज ऐकून त्यांच्या भावनांशी जोडण्यास मदत मिळणार आहे, असं ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांनी सांगितलं.