नवी दिल्ली – एक मार्चपासून खासगी केंद्रांवर लसीकरण करण्याची परवानगी दिल्यानंतर सरकार लशीची किंमत ठरवण्याच्या दिशेने पावलं उचलत आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या एका डोससाठी २५० रुपये घेऊ शकतात, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एक मार्चपासून ६० वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ ते ५९ वर्षांच्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना लस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस देण्यात येणार आहे. तर खसागी रुग्णालयात लशीसाठी पैसे अदा करावे लागतील.
लसीकरणासाठी जास्तीत जास्त २५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. यामध्ये १५० रुपये लशीची किंमत आणि १०० रुपये सर्व्हिस चार्ज स्वरूपात वसूल करण्याची परवानगी असेल. राज्य आणि केंद्र सरकारला याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलं, की कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवर आपली नोंदणी करून पात्र लोक लस घेऊ शकतात. या डिजिटल प्लॅफॉर्मवर त्यांना जवळच्या सरकारी किंवा खासगी लसीकरण केंद्रांत उपलब्ध तारीख आणि वेळेची माहिती मिळेल. लोक आपल्या इच्छेनुसार केंद्र निवडू शकतात. लसीकरण केंद्रांवर नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.
खासगी लसीकरण केंद्रांवर पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आल्या आहेत. सोबतच आरोग्य मंत्रालयांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन व्हावं, असं सांगण्यात आलं आहे. लस घेण्यासाठी आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र जवळ असणं अनिवार्य आहे. ४५ ते ५९ वर्षांच्या लोकांना त्यांच्या आजारासंदर्भातील प्रमाणपत्र जवळ असणं आवश्यक आहे.