नाशिक – कोरोनाकाळात स्वतःला शारीरिक दृष्ट्या फीट ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमित व्यायामाला प्राधान्य दिले आहे. शहरातील व्यायामाच्या ठिकाणी तसेच जॉगिंग ट्रॅक येथे नागरिक व्यायाम करत असतात. तसेच ट्रेकिंगसाठी बहुतांश जण थेट पांडवलेणी गाठतात. परंतु पांडवलेणी व्यवस्थापनाने थेट प्रवेशद्वार बंद केले असल्याने फिरायला गेलेल्या नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
पांडवलेणी मुख्य प्रवेशद्वार तसेच टेकडीवरील लेण्या पाहण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. मधल्या काळात नागरिकांसाठी प्रवेश खुला करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा तेथे प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. रविवारी ऑनलाईन शाळांना सुट्टी असल्याने बहुतांश जण कुटुंबासह तेथे फिरायला येत असतात. परंतु, आता मुख्य मार्ग बंद असल्याने त्यांना पर्यायी टेकडीच्या मागील रस्त्याचा वापर करावा लागत आहे. जागतिक पर्यटन दिनी पर्यटनास गेलेल्या अनेकांना याठिकाणी आल्यानंतर तीव्र मनस्ताप सहन करावा लागला आहे. नागरिकांनी विचारणा केली असता लॉकडाऊनमुळे प्रवेश बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे फिरण्यासाठी पांडवलेणीला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र दिसते आहे.