नवी दिल्ली – व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनने (कॅट) येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) तरतुदींमध्ये झालेल्या बदलांचा आढावा घेऊन त्या सुलभ करण्यात याव्यात यासह अन्य मागण्या कॅटने केल्या आहेत. या बंदमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटना सामील होणार आहेत. बंदमुळे देशभरातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील, असा दावा कॅटने केला आहे.
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, जीएसटीच्या तरतुदींविरोधात देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीचा आढावा घ्यावा आणि करांचे स्लॅब अधिक सुलभ केले पाहिजे आणि नियम अधिक तर्कसंगत केले पाहिजे.
या संदर्भात खंडेलवाल पुढे म्हणाले की, अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन (एआयटीडब्ल्यूए) देखील कॅटच्या भारत बंद आणि चक्का जामच्या आवाहनास पाठिंबा देईल. देशातील सर्व व्यापारी बाजारपेठा बंद राहतील आणि सर्व राज्यांच्या विविध शहरांमध्ये बंद पाळला जाईल. देशभरातील ४० हजारहून अधिक व्यापारी संघटना या बंदला पाठिंबा देतील.