नवी दिल्ली ः वस्तू आणि सेवा करमधील (जीएसटी) कमतरता दूर करण्याच्या मागणीसाठी तसंच पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात देशातल्या व्यापाऱ्यांनी पुकारलेला भारत बंद सुरू झाला आहे. या बंदमध्ये जवळपास ८ कोटी छोटे व्यापारी सहभागी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.. तसंच देशातील १ कोटी वाहतूकदार, लघुउद्योग आणि उद्योजिका या बंद सहभागी होत असल्याचाेही संघटनांनी सांगितले आहे.
द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन केलं होतं. त्यामुळे आज सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद आहेत. रस्ते वाहतूक क्षेत्रातील मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोटर्स वेलफेयर असोसिएशननं कॅटच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत चक्काजाम करण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही मालाची बुकींग, डिलेव्हरी, माल चढवणं-उतरवणं बंद राहील. सर्व परिवहन कंपन्यांनी विरोध दर्शवण्यासाठी वाहनं पार्क करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. देशभरात जवळपास १५०० ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसू शकतो.
विविध संघटनांचा सहभाग
देशातील वाहतूक क्षेत्रातील विविध संघटना बंदमध्ये सहभागी होतील. त्यामध्ये ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अॅल्युमिनिअम युटेमसिलस मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाईसिस ट्रेडर्स असोसिएशन, ऑल इंडिया वुमेन एंटरप्रिनियर्स असोसिएशन, ऑल इंडिया कॉम्प्युटर डिलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांचा समावेश आहे.
काय बंद, काय सुरू
देशातले सर्व व्यावसायिक बाजार बंद राहतील असं कॅटनं म्हटलं आहे. तसंच १ कोटी वाहतूकदारांनी २६ फेब्रुवारीला बंद आणि चक्काजामची घोषणा केली आहे. चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संघटनेनं आणि कर सल्लागारांनीसुद्धा आपल्या क्लायंट्सना कार्यालयात न येण्याचं आवाहन केलं आहे. बंदला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत बंदचे चित्र स्पष्ट होईल.