नवी दिल्ली – कोरोनाच्या काळात बँकांनी आकारलेल्या कर्जावरील व्याजासंबंधी आनंदाची बातमी आहे. व्याजावर व्याज दिल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत बँकांतर्फे ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात सर्व बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ५ नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले होते.
संबंधित नियमांच्या आधारे सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेकडून ग्राहकांना पैसे जमा करण्यात आल्याचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय वित्त मंत्रालयाने याबाबत भूमिका स्पष्ट केली असून ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे.
सोने तारण कर्जाअंतर्गत कर्ज घेतलेले ग्राहक देखील यासाठी पात्र असल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे इतर लहान-मोठे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना देखील या योजनेअंतर्गत सूट देण्यात येणार आहे. तसेच संबंधित योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे साक्षीदार असल्यास योजनेच्या नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत असे देखील वित्त मंत्रालयाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या महिन्यात याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज यासारख्या सर्व कर्जाचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.