नाशिक – जिल्ह्यातील व्यवसायाच्या वेळांचे संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही बाबी स्पष्ट करणे गरजेचे वाटते असे सांगत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कुठे काय आदेश काढले जातात हे सर्वांना ज्ञात असते, परंतु त्याचबरोबर त्या शहरांमध्ये किती लोक रोज मरत आहेत, त्यांचा रुग्णसंख्या आलेख कसा आहे याचीही माहिती घेणे आवश्यक असते. काही शहरांनी मध्यंतरी अचानक पूर्ण लॉक डाऊन केला होता. त्यावेळी आपण मात्र आपल्या “अन लॉक डाऊन” वर ठाम राहिलो कारण इतरांचे अंधानुकरण करणे कधीच समर्थनीय होत नाही.
त्यामुळे आता इतर शहरांतील आपल्या सोयीचे आहे ते येथे करावे अशा मागण्या करणे योग्य नाही. मृत्यू जोपर्यंत आपल्या स्वतःच्या दाराशी येत नाही तोपर्यंतच प्रत्येकाला अन्य बाबी महत्त्वाच्या वाटतात. शेवटी सर्व बाबींचा सारासार विचार करून सर्वांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असते. शासन आणि प्रशासनाला साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधायचा आहे. एकसूत्रता राहण्याच्या दृष्टीने व अंमलबजावणी करणे शक्य व्हावे यादृष्टीने सर्वच व्यवसायांच्या वेळा एकसमान ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केलेली कार्यवाही योग्य आहे वेळोवेळी योग्य व संतुलित निर्णय घेतल्यानेच आज जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात आहे याची जाणीव असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.