– रक्षाबंधनाच्या दिवशी दिली वैष्णवीला २८ हजारांची मदत
– ‘चिचोंडी न्यूज’ व्हॉटसअप ग्रुप ने राबविला सामाजिक उपक्रम
येवला – तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथील अतिशय गरीब कुटुंबातील वैष्णवी परसराम मढवई हिने इयत्ता दहावीत
तालुक्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवित गावाचे नाव मोठे केले. तिच्या या दैदीप्यमान कर्तबगारीचे सर्व गावाला कौतुक वाटले. आई-वडील दोघेही शेतमजूर. आपल्या लेकीचे कौतुक करण्यासाठी गावातील ‘चिचोंडी न्यूज’ या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तिच्यावर बक्षीस रुपी वर्षाव सुरू झाला. दोन दिवसात या ग्रुपच्या माध्यमातून जमलेली २८ हजार रुपये रक्कम वैष्णवीला रक्षाबंधन दिनाची भेट म्हणून चिचोंडी बुद्रुक येथील सरपंच रवींद्र गुंजाळ यांच्या हस्ते देण्यात आली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील चिचोंडी न्यूज नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतो. या ग्रुपवर निकाल लागल्यानंतर तिच्या कौतुकाची व परिस्थितीची पोस्ट पडली. आणि मनातील संवेदना आपोआप जाग्या झाल्या अन एक भावनिक साद वैष्णवीसाठी तयार झाली. वर्तमानपेपर मधील बातमी, मीडियावरील बातमी बघून ग्रुपचे सदस्य दिनेश राऊत पाटील यांनी सर्वप्रथम मदत जाहीर केली अन बघता बघता दोन दिवसात ही मदत २५ हजारांच्या पार झाली. त्यानंतर इतरांनीही मदतीचा हात पुढे केला. या ग्रुपच्या माध्यमातून जमलेले एकूण २८,३२१ रुपये रक्कम वैष्णवीला देण्यात आली.
यावेळी डॉ व्ही.सी.पैठणकर, मिलिंद गुंजाळ, प्रमोद पाटील, नितीन पवार, समाधान मढवई, वैष्णवी मढवई यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब रोकडे, बाबासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाबासाहेब जाधव, प्रा. विजय मढवई, नवनाथ मढवई, नारायण मढवई, आदी ग्रुप सदस्य उपस्थित होते. सर्वांनी केलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वैष्णवीच्या पुढील शिक्षणास आर्थिक बळ मिळणार आहे.