मुंबई ः राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने आज सुरुवात झाली. सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आलेल्या विरोधीपक्ष भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहाबाहेर परस्परविरोधी घोषणा देत अधिवेशनाचा ट्रेलर दाखवला. दरम्यान, वैधानिक विकास महामंडळावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. सरकारच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं भाजपनं सभात्याग केला.
सीमा प्रकरणात सरकारची भूमिका ठाम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाच सुरूवात झाली. कोरोनायोद्ध्यांना अभिवादन करत त्यांनी अभिभाषणाला सुरुवात केली. कर्नाटक आणि राज्याच्या सीमेबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य सरकारनं प्रभावी काम केलं. तसंच उपाययोजना करताना मदतीसाठी टास्कफोर्सची स्थापना केली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून, कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळा वाढवल्याची माहिती त्यांनी दिली.
माझी कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला असल्याचं कौतुकही त्यांनी केलं. औद्योगिक मंदी असतानाही सरकारनं चांगलं काम केलं. रोजगार मिळणं सुलभ व्हावं म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरू केलं. आर्थिक अडचण असताना शेतक-यांची कर्जमाफी केल्याचा उल्लेखली राज्यपालांनी केला.
वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का करण्यात आली नाही हा मुद्दा उपस्थित करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. विदर्भ, मराठवाड्यात महाराष्ट्रातील लोक राहतात हे सरकारनं लक्षात ठेवावं. याबाबत राजकारण न करता लोकांसाठी हा प्रश्न सोडवावा असा आग्रह त्यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देऊन ७२ दिवस झाले आहेत. ते पूर्ण करणार आहात का, असा सवाल त्यांनी केला. त्यावर अजित पवार म्हणाले, विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. अर्थसंकल्पात तसा निधीही देऊ. पण मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला आहे, ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर केली जातील त्याच्या दुस-या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करू, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीसांचा संताप
अजित पवार यांच्या उत्तरावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस संतापले. ते म्हणाले, मी दादांचे आभार मानतो, की त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भाला ओलीस ठेवलं आहे. किती राजकारण करत आहात, असा सवाल त्यांनी केला. हा विषय तुमचा आणि राज्यपालातला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्याशी काय संबंध. राज्यपाल कोणत्याही पक्षाचे नाहीत. असं म्हणू नका अन्यथा विदर्भ आणि मराठवाड्यातील जनता माफ करणार नाही. तुम्ही दिलं नाही तर संघर्ष करून मिळवू. आम्ही भिकारी नाही आहोत. ते आमच्या हक्काचं आहे. घेतल्याशिवाय राहणार नाही, असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, अजित पवारांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.