नाशिक – वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना शासन कोणावरच अन्याय होवू देणार नाही. शासन सर्वांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी धरणग्रस्तांना दिली. थेट वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
धरणाच्या बांधकामासाठी जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या मात्र काहींचा उपयोग झाला नाही. आजही शेतकरी अशा जमिनी कसतात. त्या शेतकऱ्यांचे म्हणणे मंत्री जयंत पाटील यांनी ऐकून घेतले. वैतरणा धरणग्रस्तांच्या विषयावर महसूल, अर्थ, विधी व न्याय विभागाच्या सचिवांसह लवकरच बैठक घेऊन काही दिवसात या विषयावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.