नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या वेळेच्या निर्बंधांतून वाहतूक व्यवसायाला सूट देण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडेय,मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात वाहतूक विभागाने दिवसरात्र सेवा देण्याचे काम केले आहे. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक निर्बंध घालण्यात आले असून वेळेची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. या मर्यादेचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या मर्यादा घातल्या जात असताना ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही वेळेच्या सवलती देखील देणे तितकेच महत्वाचे आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा पूर्णपणे उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे जसे उद्योग व्यवसाय चालतील त्याप्रमाणे वाहतुकदारांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे उद्योगांना दिलेली वेळेची सवलत ही ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना देखील देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, नाशिक शहरात मुख्यत्वेकरून जास्तीत जास्त ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचे कार्यालय हे द्वारका व आडगाव आणि पाथर्डी फाटा परिसरात आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोडिंग आणि अनलोडिंगची कामे केली जातात.दि.२७ मार्च रोजी याच परिसरात रात्री ८ वाजता गाडीमध्ये माल लोडिंग करत असतांना भद्रकाली पोलीस स्थानकातील पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता समज दिली आहे. त्यामुळे सर्व वाहतूकदार चिंतेत आहे. वाहतुकदारांना कंपनीतून ज्या वेळेस माल उपलब्ध होईल त्यावेळेस लोडिंग आणि अनलोडिंग चे कामे होतात. त्यात जर पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांवर कारवाई केली तर वाहतूकदारांना सेवा देणे कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाने आपल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांना वेळेत विशेष सवलत देण्याची गरज असल्याचे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.