नवी दिल्ली/मुंबई – गुजरातमधील सूरत शहरात एकाचवेळी तब्बल ३२ रिक्षाचालकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सुपर स्प्रेडरचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान हे उघडकीस आले आहे.
सूरत महानगरपालिकेचे आयुक्त बी.एन. पाणी यांनी सांगितले की, सूपर स्प्रेडरचा शोध घेण्यासाठी रिक्षाचालक, भाजी विक्रेता आणि दुकानदारांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या. यात ३४ लोकांना संक्रमण झाले असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ३२ रिक्षाचालक आहेत.
ज्या लोकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत त्यांना हेल्थ कार्ड देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. शिवाय सूरत शहरात बिना मास्क बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सूरतमध्ये ४५ हजार १८२ लोकांना संक्रमण झाले आहे. यातील ४२ हजार ५४४ बरे झाले असून ८६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर महाराष्ट्रात कठोर पाऊल उचलणार
महाराष्ट्रात कोरोनाचा ग्राफ वेगाने वाढत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोक नियमांचे पालन करतील तरच दुसऱ्या लॉकडाऊनपासून आपण वाचू शकतो, असे म्हटले आहे. मात्र पुढील काही दिवसांत २५ ते ३० हजार रुग्ण दिवसाला वाढू लागले तर कठोर पाऊल उचलणे जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या भागांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे तिथे लॉकडाऊन अखेरचा पर्याय आहे. ज्या शहरांमध्ये स्थिती जास्त वाईट आहे, तिथे लॉकडाऊन लावण्यात येऊ शकतो. विदर्भात नागपूरसह काही शहरांमध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली, असेही ते म्हणाले.
ठाण्यात २४ तासांत २ हजार १७३ रुग्ण
ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २ हजार १७३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता ठाण्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ९० हजार ६१६ झाली आहे. तर ६ हजार ३९२ लोकांचा मृत्यू झाला आहे.