वीटभट्टी मजूर झाला द्राक्ष बागायतदार…!
सुटले ‘ग्रहण’ दारिद्रयाचे, ‘दान’ मागणे बंद झालं.
“ग्रहण आले की, ‘ दे दान, सुटे गिऱ्हाण ’ अशी हाक मारून गावात धान्य, जुनी – पानी कपडे गोळा करणं. अमावस्या आली की, तेल- मीठ – पीठ गोळा करणं, मिळालेल्या याच कपड्यांनी वर्षानुवर्षे अंग झाकणं व तेल- मीठ – पीठानं पोटाची खळगं भरणं, यात अर्थ आयुष्य गेलं. तर कधी वीट भट्टीवर चिखल-मातीत राबलो. तर कधी पारंपरिक व्यवसाय असलेला झाडू बनवून ते आठवडा बाजारात विकण्याचं काम केलं ; अशातचं शासन पाठीशी खंबीरपणे धावून आलं. आयुष्याचं हे गिऱ्हाण सुटलं. स्वाभीमानानं जगण्याचं बळ मिळालं ” अशी भावना सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी विश्वनाथ चंदर गोरखे व बेबी विश्वनाथ गोरखे या दांम्पत्यानं व्यक्त केली आहे.
पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर हे विश्वनाथ चंदर गोरखे यांचे मूळ गांव. पारंपरिक व्यवसाय सांभाळत गावातचं ते आपल्या पत्नी व मुलाबाळांसह वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. पोटाची भूक भागविण्यासाठी आपले जन्मगांव सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. अशातच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेविषयी माहिती मिळाली. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर कार्यालयात ते गेल्यावर तेथे समाज कल्याण निरीक्षक बाळासाहेब देव्हारे यांनी त्यांना या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांना या योजनेचा अर्ज ही दिला. स्वत: देव्हारे यांनी त्यांना या योजनेचा अर्ज ही लिहून दिला.
जिल्हाधिकारी यांच्या ‘लॅकी ड्रा’ सोडतीमध्ये ते भाग्यवान ठरले. शासनाच्या या योजनेत त्यांना 2 एकर बागायत जमीन कसायला मिळाली. त्यामुळे पोट भरण्याकरीता स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्या कुटूंबावर आली नाही. मिळालेल्या जमिनीलगत असलेल्या पाटचारी पाण्याचा आधार व निसर्गाची साथ यामुळे त्यांनी 2 एकर शेतात कांदा, हरबरा, टोमॅटो, वांगी, मिरची अशी एका – मागून – एक नगदी पीके घेतली. भाजीपाला पिकांमुळे त्यांच्या हातात पैसे खेळू लागले. दोन मुली व एका मुलाचे लग्न धामधुमीत केलं. शेतात बोरवेल घेतला. त्यामध्ये इलेक्ट्रीक मोटार बसविली. वीज कनेक्शन ही घेतले.
सध्या गोरखे यांच्या शेतात 1 एकर द्राक्षाची बाग फुलून आली आहे. द्राक्ष निर्यातीमुळे त्यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे. अर्धा एकर लिंबुणीची बाग असून, उर्वरीत अर्धा एकर शेतात टरबूज लागवड केली आहे. शेतातच झोपडी बांधून ते आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. शासनाच्या या योजनेमुळे जीवनात कायापालट झाला आहे. अशी कृतज्ञतापूर्वक भावना विश्वनाथ गोरखे व्यक्त करतात.
अहमदनगर जिल्हयामध्ये सबळीकरण व स्वाभीमान योजनेत जमीन वाटप केलेल्या लाभार्थीची अशी अनेक उदाहरणे आहेत. ही सर्व कुटुंबे आर्थिकदृष्टया सक्षम झाली आहेत. त्यांचा आर्थिकस्तर ही उंचावलेला दिसून येत आहे. तसेच काही लाभार्थींनी 50 टक्के व्याजाची रक्कम देखील परतफेड करण्यास सुरुवात केलेली आहे. शासन निर्णयात फक्त जमीन देण्याची तरतुद आहे. परंतु अहमदनगरचा समाज कल्याण विभाग फक्त जमीन वाटप करून थांबलेला नाही तर, त्याही पुढे जाऊन विविध शासकीय विभागाशी संपर्क साधून अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत बैलगाड्या, शेती औजारे, नांगर, फवारणी यंत्रे, बी-बियाणे, खते, पाईपलाईन, वीज जोडणी आदी शेती विषयक योजनेचा लाभ या लाभार्थांना समाज कल्याण विभागाने मिळवून दिलेला आहे.
– सुरेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाजकल्याण विभाग, नाशिक