भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांची मागणी
मुंबई – लॉकडाऊन काळात ग्राहकांना दिल्या गेलेल्या भरमसाठ वीज बिला पोटी राज्य सरकारने वीज वितरण मंडळाला ६ हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आणि राज्य वीज मंडळाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली आहे. मंत्र्यांच्या व अधिकाऱ्यांसाठी गाड्या खरेदी करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव जसा तातडीने मंजूर केला, तशीच तत्परता वीज मंडळाला अनुदान देण्याबाबत दाखवावी, असेही पाठक यांनी नमूद केले आहे.
पाठक यांनीम्हटले आहे की, राज्यातील ग्राहकांना अव्वा च्या सव्वा वीज बिले पाठवली गेल्याने राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. ग्राहकांना तत्परतेने दिलासा देण्यापेक्षा महविकास आघाडी सरकार या प्रश्नी निव्वळ चालढकल करीत आहे. या प्रश्नी मंत्री गटाची बैठक झाली. त्यात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा मुक्ताफळे उधळली. सरकार अनुदान म्हणून महावितरणला मदत करेल, ज्याचा ९३ टक्के ग्राहकांना लाभ होईल. महावितरणचे ग्राहक वर्षाला सरासरी ७० हजार कोटी एवढी रक्कम बिलाच्या माध्यमातून देत असतात. त्यामुळे आज त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने कमीत कमी एक महिन्याचा महसूल म्हणजेच ६ हजार कोटी इतकी रक्कम म्हणून अनुदान द्यावी, तरच ग्राहकांना दिलासा मिळेल. ५०० कोटी, १ हजार कोटी एवढे अल्प अनुदान देऊन ग्राहकांची थट्टा करू नये, असेही पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे.