नाशिक – लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने दिलेल्या वीज बीलांच्या प्रचंड तक्रारींची दखल अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. याप्रकरणी ते आज (११ ऑगस्ट) मुंबईत बैठक घेत आहेत. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात ही बैठक होत आहे. या बैठकीस राज्यातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्योजक, व्यावसायिक, विविध संघटना, संस्था, अभ्यासक आदींचा समावेश आहे. वीज बीलांचा घोळ नेमका काय आहे, त्यावर तोडगा काय असू शकतो, याची माहिती ते या बैठकीत घेणार आहेत. या प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच पवार यांनी यात लक्ष घातले आहे. या बैठकीनंतर पवार हे राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.