दिंडोरी – तालुक्यातील निळवंडी येथे विषारी औषध सेवनाने मृत्यू झालेल्या विवाहितेच्या संप्तत नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात नवरा, सासू, सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी निळवंडी येथील विवाहिता अश्विनी किरण पताडे हिने औषध सेवन केल्याने तिला नाशिक येथे रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. सासरच्याच लोकांनी तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजले, असा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला. तिचे माहेर आडगाव (ता. नाशिक) येथील आहे. तिचे शव दिंडोरीला आणण्यात आले. सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय माहेरच्या नातेवाईकांनी घेतला. त्यानंतर दिंडोरी पोलिस ठाण्यात सर्व नातेवाईक जमा झाले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी अश्विनी हिचा मृतदेह घेऊन निळवंडी आले. सासरच्या घरासमोरच त्यांनी अंत्यविधी केला.
सासरच्या लोकांनी फ्लॅट घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी पूर्ण केली नाही. तसेच घरगुती व शेतीचे काम करत नाही या आणि इतर कारणांवरुन शारिरीक व मानसिक छळ करीत होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती किरण संजय पताडे, सासरा संजय राजाराम पताडे, सासू कल्पना संजय पताडे, दीर रोशन संजय पताडे, (रा. निळवंडी ता.दिंडोरी), नंदई तुषार पोपटराव दयाळ, नणंद मोनिका पोपटराव दयाळ (रा. नाशिक) यांच्याविरुध्द भा.द.वि.कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचे वडील भाऊसाहेब दगु हळदे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांच्यासह पोलिस हवालदार करीत आहेत.