नाशिक – बँकांतील कर्मचारी कर्तव्यतत्पर, सावधगिरी बाळगणारे असतील तर ग्राहकाचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतात, रोखू शकतात याची प्रचिती विश्वास को-ऑप. बँकेचे ग्राहक भास्कर पोरजे यांना आली आहे. त्यांनी बँकेच्या व्यवस्थापनाचे, कर्मचारी व अधिकारी वर्गाचे कौतुक केले आहे.
मोबाईलवर आजकाल अनेक फसवणूक करणार्या योजनांचे फोन येतात व त्याद्वारे ग्राहकाला फसवण्याचा प्रयत्न केला जातो. विश्वास को-ऑप. बँकेच्या इंदिरानगर शाखेचे ग्राहक भास्कर पोरजे यांना मोबाईवर एका अज्ञात इसमाकडून बक्षिस योजनेअंतर्गत फोन येत होता. त्यांच्या खात्यावर १८०० रुपये ट्रान्सफर करण्यासाठी फोनवरील व्यक्ती सांगत होती. ते ऐकून पोरजे बँकेत आले व शाखेतील कर्मचारी शोएब शेख यांना सांगितले की वरील रक्कम माझ्या मोबाईलवरून ट्रान्सफर करून द्या. त्यानंतर माझ्या खात्यावर दहा लाख रुपये जमा होणार आहेत. हे ऐकताच शोएब शेख यांनी पोरजे यांच्या मोबाईलवरून समोरील पैसे मागणार्या व्यक्तीला फोन केला व व बक्षीसाविषयी चौकशी केली असता त्याने अरेरावीची भाषा केली व बक्षिसाचे तपशील व नाव सांगण्यास नकार दिला. शेख यांनी सदर घटना शाखाधिकारी स्मिता पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीदेखील फोन करणार्या व्यक्तीशी संपर्क साधला.
सदरचा प्रकार फसवणूकीचा असल्याचे लक्षात आले व त्यांनी पोरजे यांना समजावून सांगितले व होणार्या आर्थिक नुकसानीपासून रोखले. शेख यांनी पोरजे यांना यापुढे अशा कुठल्याही योजनांना बळी न पडता आपला खातेक्रमांक, पिन क्रमांक कोणालाही देऊ नये याविषयी समुपदेशन केले. बँकेचे कर्मचारी शेख यांच्या जागरूकतेमुळे सदर खातेदाराचे होणारे संभाव्य दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान टळले.
विश्वास बँकेत सातत्याने प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते त्यात बँकींगमधील आधुनिक बदल, सायबर क्राईम, मनी लाँडरींग यांसारख्या विषयांचा समावेश असतो. त्यात बँकींग व संगणक क्षेत्रातील अभ्यासू मान्यवर मार्गदर्शन करत असतात. त्याचा उपयोग कर्मचार्यांना होत असतो. असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. ते पुढे म्हणाले की आजच्या वेगाने बदलणार्या बँकींग क्षेत्रातील बदलांचा स्वीकार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आणि गरज आहे. त्यातूनच ग्राहकसेवेविषयीचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल.
बँकेचे कर्मचारी शोएब शेख यांच्या कामगिरीबद्दल त्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद धटिंगण, अति. मुख कार्यकारी अधिकारी सारीका देशपांडे व महाप्रबंधक रमेश बागुल यांनी अभिनंदन केले आहे.