नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्या डावात ६ गडी बाद करून भारताचं पुनरागमन केलं. या सामन्यात अश्विननं पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडच्या रोरी बर्न्सला बाद करून १०० वर्षांपूर्वी झालेल्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. असा विक्रम करणारा अश्विन पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळल्या जाणार्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात अश्विननं ९ गडी बाद करून लक्षवेधक कामगिरी केली आहे. दुसर्या डावात त्यानं भारतासाठी ६१ धावा देत ६ गडी बाद केले. अश्विनच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतानं इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडनं भारतासमोर आता ४२० धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
११४ वर्षांनंतर कोणत्याही कसोटी सामन्यात डावाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करणारा अश्विन पहिला फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी १९०७ मध्ये ओव्हल येथील कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेचे फिरकीपटू बर्ट बोग्लर यांनी इंग्लंडचे फलंदाज टॉम हेवर्ड यांना डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. १८८८ मध्ये इंग्लंडचे फिरकीपटू बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बॅनरमॅन यांना डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं.