सरकार, शेतकरी, ट्विटर आणि ‘कू’
राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. कधी लाल किल्ला, कधी चक्काजाम, तर आता ‘रेल्वे रोको’ची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा संसदेतील भाषणात शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले आणि शेतकऱ्यांनी चर्चेची वेळही मागितली. सरकार आणि शेतकरी यांच्यात बऱ्याच वेळा चर्चा होऊनही यावर तोडगा निघालेला नाही आणि एवढ्यात निघेल असे वाटत नाही. कारण त्यांनी दोन ऑक्टोबरपर्यंत थांबायची तयारी केली आहे. तूर्तास तरी सारा फोकस वेगळ्याच कारणाकडे वळला आहे. तो म्हणजे ट्विटर या समाजमाध्यमाचा वापर. सरकारने घेतलेला आक्षेप, काही खाती बंद करण्यास ट्विटरने दिलेला नकार, त्यावरून ट्विटर पदाधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची शक्यता असल्याची बातमी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्विटरला प्रतिस्पर्धी म्हणून निघालेले ‘कू’ नावा चे ॲप, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हे प्रकरण वाटते तितके सरळ नाही आणि कोणती बाजू मर्यादा ओलांडून जात आहे हे स्पष्ट सांगणे ही कठीण आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]
काही ट्विटर हॅण्डलवरून शेतकरी आंदोलनाचा प्रचार चुकीच्या पद्धतीने झाला असे सरकारचे म्हणणे आहे. भारतीय कायद्याप्रमाणे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी ते स्वातंत्र्य कुठपर्यंत आहे आणि काय बोलले की या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याचे म्हटले जाऊ शकते हे सध्या चर्चेत आहे. सरकारी म्हणण्यानुसार काही ट्विट देशाला हानिकारक आहेत, काही ट्विटमुळे हिंसाचार होऊ शकतो आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे कोणतेही ट्विट आम्ही सहन करणार नाही. म्हणून ट्विटरने आम्ही सांगू त्या ट्विटर हँडलवर बंदी घातली पाहिजे. भारताने जवळपास दीड हजार ट्विटर हँडलवर बंदी घालण्यासास सांगितले होते. परंतु त्यातील केवळ ५०० हँडलवरच बंदी घालण्यात आली. उर्वरित हँडलवर मर्यादित कारवाई करण्यात आली. म्हणून सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष चालू आहे. त्यातच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गायिका लता मंगेशकर आणि त्यांच्यासारख्या काही दिग्गजांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात ट्विट केले. ते ट्विट यांना भाजपने करायला सांगितले आहेत का ह्याची चौकशी करू असे महाराष्ट्रातले राज्यकर्ते म्हणतात. हे या आंदोलनाचे उपनाट्यही रंगात आहे. मग या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.
या सगळ्या बाबतीत सरकार माघार घेते (जी शक्यता नाही ) की ट्विटरला सगळे सरकारचे ऐकावे लागेल हे लवकरच कळेल. परंतु या सगळ्या प्रयत्नात ‘कू’ नावाच्या एका ॲपने बाजी मारली आहे. अप्रमेया राधाकृष्ण आणि मयांक बिडवतका या दोघांनी बनवलेले हे ॲप ट्विटरसारखेच आहे. त्यात तुम्ही ट्विटसारखेच मेसेज करू शकता, शेअर करू शकता , किमान सात भाषांमध्ये मेसेज करू शकता. जवळपास तीस लाख लोकांनी हे वापरायला सुरुवात केली आहे २०२० च्या मार्चमध्ये ॲप सुरू करण्यात आले, तेव्हा कन्नड भाषिकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. परंतु ट्विटरच्या अलीकडच्या वादानंतर ट्विटरला पर्याय आहे म्हणून लोक तिकडे वळले असे म्हणता येईल. हा वेग इतका प्रचंड आहे की ‘कू’च्या सर्व्हरवर ताण यायला लागला आणि ‘कू’ मधील सर्च फंक्शन कमी वेगाने चालायला लागले. त्याचप्रमाणे इतरही अडचणी आल्या. म्हणून ‘कू’च्या निर्मात्यांना सर्व्हरची संख्या व क्षमता वाढवावी लागली.









