विशेष लेख – कवियित्री शांता शेळके यांचा जन्मदिन १२ ऑक्टोबर (काटा रुते कुणाला हे शांता शेळके यांचे गीत शेवटी श्रुती जोशी यांच्या आवाजात )
….
ऋतु हिरवा, ऋतु बरवा
विशाखा देशमुख, जळगाव
………
सारी सृष्टी हिरवाईने नटलेली असताना शांता शेळके यांचे ऋतु हिरवा, ऋतु बरवा हे गाणे ओठावर येते. तर गणपती उत्सवात गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया या शांताबाईंच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून जातो. याच प्रमाणे जय शारदे वागेश्वरी, शूर आम्ही सरदार, जीवन गाणे गातच रहावे, पाऊस आला वारा आला अशा कितीतरी गीतांमधून शांताबाईंनी आपल्याला समृध्द केले आहे…..
बहुमोल शब्दलेणं देणाऱ्या शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. त्या त्यांच्या आईला अंबिका वहिनी तर वडिलांना दादा म्हणत. त्यांचे वडील रेंज ऑफिसर होते. नोकरी निमित्ताने त्यांच्या सतत बदल्या होत. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना पुण्यात यावे लागले. शालेय शिक्षण सेवासदन व हुजूरपागा येथे गेल्याने सुसंस्कृत, अभिजात अशा शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. घरात वाचनाचे वेड सगळ्यांनाच होते. जे पुस्तक हाती येईल ते त्या वाचत. शाळेत बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तके ही त्यांच्यासाठी पर्वणी असायची. १९३८ मधे त्या मॅट्रिक झाल्या. आपणही कविता लेख लिहावे असे त्यांना वाटे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात बीए करत असतांना मेघदूत, हॅम्लेट अशी पुस्तके त्यांनी वाचली होती. कॉलेजच्या नियतकालिकांसाठी त्यांनी लेख लिहिला. त्या लेखनाबद्दल प्रा.माटे यांच्या अभिप्रायाने त्यांना अजून हुरूप आला. शिक्षण घेत असताना अवांतर वाचनाची गोडी वाढीस लागली. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपारिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड संस्कारक्षम वयातच रुजत गेली. साहजिकच त्यांच्या साहित्यात ग्रामीण व नागरी दोन्हीचा प्रभाव जाणवतो.
बीए झाल्यावर संस्कृत विषय घेऊन पुणे विद्याीठातून त्या एमए ची परीक्षा सुवर्णपदकाच्या सन्मानासह उत्तीर्ण झाल्या. एमए झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नवयुग या साप्ताहिकात लेखनिका म्हणून काम केले. त्यावेळेस आचार्य अत्रेसुध्दा शांताबाईंच्या विद्वत्तेने प्रभावित झाले. मग त्यांनी संपादनाचे काम पाहिलं. इथे पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरल्यामुळे साहित्याच्या दृष्टीने ललित गद्य लेखनासाठी माझी मराठी भाषा साधी सोपी व सुबक झाली हे अत्र्यांचं माझ्यावर मोठं ऋण आहे, असं शांताबाई म्हणत असत. असं लेखन संपादन केल्यामुळे साहित्यविषयक गोष्टी व अनुभवाची शिदोरी त्यांना मिळाली होती. महाविद्यालयांमध्ये असतांनाच त्या गो.म जोशी यांच्या कडून उत्तररामचरित्र आणि ऋग्वेदातले उतारे शिकल्या होत्या. संस्कृत भाषेचा हा अभ्यास आणि अभिजात काव्याचे हे संस्कार त्यांच्या कवितेची शब्दकळा घडवण्यात सहायभूत ठरले. शांताबाई यांची पहिली कविता बीएच्या पहिल्या वर्षी शाळा पत्रकात तर पहिला काव्यसंग्रह वर्षा हा १९४७ साली प्रकाशित झाला.
कवयित्री, गीतकार म्हणून जरी त्यांची खरी प्रतिमा समाजासमोर आली असली त्या उत्तम अध्यापकही होत्या. त्याच बरोबर अनुवादक, समीक्षक, ललित व सदर लेखन, कथा, कादंबरी, संपादन, चरित्र लेखिका बाल साहित्यिका असा चौफेर प्रवास आपल्याला दिसतो. श्रावण शिरवा या शांताबाईंच्या पुस्तकात ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे आपल्या प्रस्तावनेत लिहितात.. काव्यलेखन हा शांताबाईंच्या प्रतिभेतला सर्वात रुजलेला वाड्मय प्रकार एखाद्या घटना प्रसंगातून सुचलेला विषय असो त्यांना विनासायास त्याला काव्यरुप देता येत असे. नवनव्या कल्पना आपल्या स्मरण भांडारातून त्या मदतीला घेत. प्रचंड वाचन, आणि अदभुत स्मरणशक्ती त्यांच्या ठिकाणी होती. बालगीते, चित्रपटगीते, द्वंद्वगीते, भावगीते, कोळीगीते, भूपाळी, भक्तिगीते, असे त्यांचा लेखणीतून उतरलेले गीत प्रकार ख्यातनाम गायक गायिकांनी गायलेत. तर प्रतिभावंत संगीतकारांनी संगीतबद्ध करून अजरामर केलेत. गीत लेखन करु लागल्याच्या कितीतरी आधीपासून त्या काव्य रचना करीत असत. प्रथम त्या चांगल्या कवयित्री होत्या म्हणूनच नंतर उत्तम गीतकार होऊन अनेक गीते लिहिली. सुरुवातीला वसंत अवसरे नावानेही त्यांनी लेखन केले.
किलबिल किलबिल पक्षी बोलती, अशा बालगीतासोबतच जिवलगा राहिले रे, जाईन विचारीत रानफुला, दिसते मजला सुख चित्र नवे, मराठी पाऊल पडते पुढे अशा एकाहून एक रचना तसेच वल्लव रे नाखवा हो, राजा सारंगा. राजा सारंगा, वादळ वार सुटलं ग अशी अत्यंत लोकप्रिय कोळीगीते त्यांनी लिहिली आहेत. कुठलाच गीत प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. मराठमोळी लावणी रेशमाच्या रेघांनी, पदरा वरती जरतारीचा मोर नाचरा हवा लिहून रसिकांच्या मनात स्थान मिळवलं.
नाट्यगीते लिहूनही त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्याबद्दल शांताबाई एक किस्सा सांगत.. लेखक रणजित देसाई व पं. जितेंद्र अभिषेकी यांना त्यांचं गीत पसंत नव्हतं. त्या नाटकात एक नायक उदास असतो. त्याला जे साध्य करायचं आहे ते होत नाही. शेवटी आपल्या हाती काहीच आल नाही अशी त्याच्या मनाची अवस्था असते. असा तो प्रसंग असतो. पण शांताबाईंनी लिहिलेले गीत त्यांना न आवडल्याने त्यांनी एक शेर ऐकवला. मग तो ऐकून त्यांच्या लेखणीतून काटा रुते कुणाला हे सर्वपरिचित गीत साकारले. शांताबाई यांचं एक विलक्षण लोकप्रिय गीत म्हणजे तोच चंद्रमा नभात हे गीत. यशस्वी चंद्र गीतांमध्ये मनाच्या स्वरलिपीत कोरले गेलेले हे गीत ऐकणाऱ्यला आनंदाचं वेड लावत तर गाणाऱ्याला ओढ लावत. शांता शेळके व सुधीर फडके यांच्या रचनेतील हे अवीट गोडीच गीत शीला भट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून घेतल्याचे त्या सांगत असत. त्यांना निसर्ग फार आवडे. डोक्यावर पदर आणि मोठे कुंकू त्याच्या व्यक्तिमत्त्वावर घालत होते. आपला साधेपणा त्यांनी सतत जपला. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्याच असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे या गीता प्रमाणे असणार आहे.
विशाखाताई खूप छान लिहिलेत.
श्रुतीचे गाणे पण ????
Khupch chaan lihiles tai. Ashich chaan chaan lihit raha.