दिंडोरी – मराठा आरक्षण प्रश्नी दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना विशेष अधिवेशन व आरक्षण प्रश्नी पुनरयाचिका दाखल करण्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांना निवेदन दिले. आमदार नरहरी झिरवाळ यांनी आपण आपल्या पाठीशी असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना याबाबत भेट घेऊन आरक्षण पुन्हा कायम कसे राहील योग्य तोडगा कसा काढता येईल यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रश्न स्थगितीचा निर्णय दिला यासाठी कोण जबाबदार, कोणी काय केले, यावर आता चर्चा नको, आता भविष्यातील मराठा आरक्षणाची परिस्थिती बघता याची जबाबदारी आपण सर्व आमदार खासदार यांनी घेणे महत्त्वाचे आहे, गेल्या अनेक वर्षापासून हा लढा असून आजपर्यंत काही आमदार-खासदार सोडले तर जास्त कोणी मराठा आरक्षण प्रश्न सभागृहात प्रश्न म्हणा किंवा आवाज उठवलेला नाही, त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा की आपण ज्या मतदारसंघातून निवडून येतो, मग तो खुला असो वा राखीव असो मराठा समाज कुठलाही भेदभाव न करता आपल्या भरघोस मतांनी निवडून देत सभागृहात पाठवितात, परंतु निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बांधिलकी जपत आपण मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविण्यात कुठेतरी कमी पडत आहोत, याची जाणीव करून द्यावी व आत्मचिंतन करावे, दोन दिवसात सर्वपक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून मराठा समाजाच्या मदतीची जाणीव ठेवून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण व इतर मागण्या संदर्भात विशेष दोन दिवसीय अधिवेशन घ्यावे व सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती याबाबत पुनर याचिका लवकरात लवकर दाखल करावी चालू शैक्षणिक वर्षात मेडिकल, उच्चशिक्षण व इतर शालेय वर्गासाठी मराठा आरक्षण रद्द करू नये, यापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती संदर्भातील आरक्षण जशास तसे ठेवून वटहुकूम काढून मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, व मराठा युवकांना न्याय द्यावा, मराठा समाजातील विद्यार्थी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सोमनाथ जाधव, गंगाधर निखाडे, रवींद्र जाधव, शिवाजी पिंगळे, मंगेश जाधव, विनायक शिंदे, अमरसिंह राजे, नितीन देशमुख, भगवान गायकवाड, विक्रम मवाळ, किशोर देशमुख, जयदीप देशमुख, विशाल देशमुख, राहुल जाधव, लखन पिंगळे, सिताराम गणोरे, गोविंद निमसे, नामदेव निखाडे, महेश ठुबे, ज्ञानेश्वर गडाख, आबा शिंदे, आदी उपस्थितीत होते,
मागण्या सरकारपुढे मांडणार
न्यायालयाने स्थगिती देताच सरकारने याबाबत गांभीर्याने घेत पुन्हा आरक्षण कसे कायम राहील यासाठी प्रयत्न सुरू केले असून मी आपल्या पाठीशी आहे आपल्या सर्व भावना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापुढे मांडून समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे झिरवाळ यांनी सांगितले.