मुंबई – बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा साला आदित्य अल्वा याला बंगळुरू ड्रग्स प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अटक करुन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. बंगळुरू केंद्रीय गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की आदित्य चार महिन्यांपासून फरार होता आणि सोमवारी रात्री चेन्नईतून त्याला अटक करण्यात आली.
आदित्य हा जनता पार्टीचे दिवंगत नेते जीवाराज अल्वा यांचा मुलगा असून त्याच्यावर फार्म हाऊसवर पार्टी आयोजित करण्याचा आरोप आहे. पोलिसांना संशय आहे की या पार्टीत ड्रग्स तसेच इतर प्रतिबंधित पदार्थ पुरविण्यात आले. आदित्यसोबत दुसरा आरोपी विरेन खन्नासुद्धा पार्टीच्या आयोजनात आघाडीवर असायचा. आदित्यवर आपल्या रिसोर्टमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे, तर विरेनवर हाय प्रोफाईल कुटुंबातील तरुणांना जाळ्यात अडकविण्याचा आरोप आहे. आदित्यला चेन्नई आणि महाबलीपुरम यादरम्यान एका रिसॉर्टवरून अटक करण्यात आली. संदीप पाटील यांनी सांगितले की त्याच्या अटकेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. पोलिसांना एट टीप मिळाली होती की तो चेन्नईत लपला आहे, त्यावरून तपासाची दिशा बदलण्यात आली.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आदित्यचे रिसॉर्ट हाऊस ऑफ़ लाईफ आणि घरात सर्च आपरेशन घेण्यात आले होते. त्यात सारे कागदपत्र हाती लागले होते. १५ आक्टोबरला आदित्यचा शोध घेताना सीसीबीने विवेक ओबेरॉय व प्रियंका अल्वाच्या मुंबईतील घरावरही छापा टाकला होता. सँडलवूड ड्रग्स केसमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा १७ लोकांमध्ये आदित्यचा समावेश आहे. या प्रकरणात अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गलरानी यांना अटक झालेली आहे.
आदित्यने कॉटनपेट पोलीस ठाण्यात ड्रग्स प्रकरणात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. तसेच आदित्यला अटकपूर्व जामीन देण्यासही नकार दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. गेल्यावर्षी आगस्टमध्ये एका आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटच्या अटकेनंतर कानडी चित्रपटसृष्टी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आहे. सीसीबीने २१ सप्टेंबरच्या नंतर फरार झालेला आदित्य आणि इतर दोघांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केला होता.