मुंबई – विविध १९ जिल्हा परिषदा आणि २७ पंचायत समित्यांमधील ६० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १० मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
पोटनिवडणूक होत असलेल्या निवडणूक विभागांची जिल्हा परिषदनिहाय नावे अशी (कंसात तालुका): रायगड- वरसे (रोहा), पुणे- शिर्सूफळ- गुणवाडी (बारामती), सांगली- उमदी (जत), सोलापूर- कुर्डू (माढा), कोल्हापूर- दत्तवाड (शिरोळ), नाशिक- कानाशी (कळवण), जळगाव- वाघोदा बु.- विवरा बु. (रावेर), अहमदनगर- सातेवाडी (अकोले), औरंगाबाद- घायगाव (वैजापूर), नांदेड- बोधडी बु. (किनवट), पेठवडज (कंधार), बारड (मुदखेड), लातूर- हाडोळती (अहमदपूर), एकुर्गा (लातूर), चापोली (चाकूर), हिंगोली- आंबा (वसमत), बीड- राजुरी न. (बीड), कडा (आष्टी), उस्मानाबाद- आष्टा (भूम), सांजा (उस्मानाबाद), जालना- पिरकल्याण (जालना), सेवली (जालना), परभणी- कोल्हा (मानवत), अमरावती- बेनोडा (वरुड), गायवाडी (दर्यापूर), देवगाव (धामणगाव रेल्वे), बुलढाणा- निमगाव (नांदुरा), उंद्री (चिखली), चंद्रपूर- मोहाडी नलेश्वर-वासेरा (सिंदेवाडी) आणि चुनाळा विरूर स्टेशन (राजुरा).
पोटनिवडणूक होत असलेल्या निर्वाचक गणांची पंचायत समितीनिहाय नावे अशी (कंसात जिल्हा): तळा (रायगड)- काकडशेत, हवेली (पुणे)- मांजरी बु., कवठे महाकाळ (सांगली)- देशिंग, शिराळा (सांगली)- मणदूर, मिरज (सांगली)- कसबे डिग्रज, सातारा (सातारा)- दरे खुर्द, शिरोळ (कोल्हापूर)- दानोळी, कळवण (नाशिक)- मोकभणगी, यावल (जळगाव)- दहिगाव, यावल (जळगाव)- भालोद, शिरपूर (धुळे)- हिसाळे, साक्री (धुळे)- हट्टी खुर्द, श्रीगोंदा (अहमदनगर)- काष्टी, अकोले (अहमदनगर)- सातेवाडी, भूम (उस्मानाबाद)- आरसोली, उमरगा (उस्मानाबाद)- मुळज, उमरगा (उस्मानाबाद)- दाळींब, अर्धापूर (नांदेड)- मालेगाव, नांदेड (नांदेड)- वाडी (बु.), मुदखेड (नांदेड)- मुगट, औसा (लातूर)- खरोसा, परळी वै. (बीड)- धर्मापुरी, अमरावती (अमरावती)- वलगाव, अचलपूर (अमरावती)- कांडली, दिग्रस (यवतमाळ)- मांडवा, भद्रावती (चंद्रपूर)- पाटाळा, चंद्रपूर (चंद्रपूर)- पडोली, मूल (चंद्रपूर)- मारोडा, मूल (चंद्रपूर) जुनासुर्ला आणि आरमोरी (गडचिरोली)- अरसोडा.