भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची मागणी
मुंबई – कोरोना संकटकाळात राज्यातल्या अनेक विलगीकरण केंद्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रकार उघडकीस आले असूनही राज्य सरकारने मात्र महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. महिला सुरक्षेसाठी नियमावली जाहीर करण्याचे केवळ पोकळ आश्वासन सरकारने दिले आहे. सरकारला महिलांच्या सुरक्षेचा विसर पडलेला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या की, पनवेलमधील विलगीकरण केंद्रामध्ये महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर मुख्यमंत्र्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची घोषणा केली. मात्र, अजून अशी कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. पनवेलमधील घटनेनंतर पुणे, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर येथील विलगीकरण केंद्रामध्ये सुद्धा असे धक्कादायक प्रकार घडले. अमरावतीतील बडनेरा प्रकरणातील आरोपीच्या वर्तणुकीची तक्रार आधीच स्टाफमधल्या महिलांनी केली होती. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सगळ्या घटनांनंतर राज्य सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. महिला सुरक्षेसाठी नियमावली तयार करू असे आश्वासन दिले मात्र अजूनही त्याची पूर्तता केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.