मुंबई – मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावत आहे, असा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्याची तत्काळ दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावला जाणार नाही. त्यांच्या हक्काचं त्यांना मिळेल. त्यांच्या हक्काचं एक कणही कमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ठाकरे यांनी दिली आहे. ओबीसी समाजात कुणीही गैरसमज पसरवू नयेत. ओबीसींच्या नेत्यांशीही सरकार सातत्याने चर्चा केली जात आहे. विरोधकांनी केविलवाणे प्रयत्न करु नयेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.