मुंबई – विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत परतण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, मात्र त्यापूर्वी त्याला केरळ उच्च न्यायालयाने आनलाईन रमी गेम ला प्रमोट करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
केरळ उच्च न्यायालयाने आनलाईन रमी गेमवर बॅन लावण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवरून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला नोटीस बजावली आहे. त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीज यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही मंडळी या गेमचे ब्रांड अँबेसिडर म्हणून तरुणांना वाईट मार्गाला लावत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती एस. मणिकुमार आणि न्या. अनिल के. नरेंद्रन यांच्या खंडपीठाने राज्य सरकारलाही नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्रिशुर येथील पाऊली वडक्कन याने उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. देशात अनेक लोक मोठी रक्कम हरल्यानंतर नैराश्यात स्वतःचा जीव गमावून बसले आहेत. त्यामुळे या गेमवर बॅन लागायला हवा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी २७ वर्षाच्या एका तरुणाने २१ लाख रुपये हरल्यानंतर तिरुअनंतपुरमच्या कुट्टीचलमध्ये आत्महत्या केली. या गेममध्ये मोठी रक्कम हरणारा सजेश सांगतो की, ‘उच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल करणे स्वागतार्ह आहे. कारण मी स्वतः सहा लाख रुपये हरलो आहे.’ या गेमकडे तरुणांना आकर्षित करण्यात ब्रँड अँबेसिडरची भूमिका मोठी असते. त्यांच्यामुळेच तरुण आकर्षित होत आहेत. मला यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागली, असेही तो म्हणतो.