नवी दिल्ली ः गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने टीका झेलणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेंटीच्या दुस-या सामन्यात मॅचविनर ठरला. विराटने मैदानात प्रत्येक जागेवर शॉट खेळून धावांची लयलूट केली आणि दमदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात विराट कोहलीने दोन विश्वविक्रम केले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या टी ट्वेंटी सामन्यात विनिंग षटकार मारताच विराट कोहलीने एक विश्वविक्रम केला आहे. विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या असून ३००० धावा करणारा तो जगातला एकमेव फलंदाज ठरला आहे. ८६ सामन्यात विराटने ३००१ धावा केल्या आहेत. यापूर्वी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३००० धावा कोणताही फलंदाज करू शकला नाही. रोहित शर्मा या विक्रमाजवळ पोहोचला आहे. परंतु गेले काही सामने तो खेळलेला नाही.
त्याशिवाय टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावात सर्वात अधिक वेळा पन्नासहून अधिक धावा करण्यात सुद्धा विराट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटने २६ वेळा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिकचे डाव खेळला आहे. यामध्ये भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला विराटनं मागे टाकलं आहे. रोहित शर्मा २१ वेळा अर्धशतक आणि ४ वेळा शतक करण्यात यशस्वी झाला आहे. परंतु विराटने फक्त अर्धशतकच झळकावले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं सर्वात जुने रूप असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये क्लेन हिल यांनी सर्वात आधी तीन हजार धावा केल्या होत्या. विव रिचर्ड्स यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये हा टप्पा पार केला होता. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी एक हजार आणि दोन हजार धावा न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमनं केल्या होत्या.