मनाली देवरे, नाशिक
…..
२०-२० षटकांचा सामना फक्त फंलदाज जिंकून देतात हे विधान सोमवारी यजुर्वेन्द्र चहल, नवदीप सैनी, शिवम दुबे आणि अनुभवी डेल स्टेन या राॕयल चॕलेंजर्स संघाच्या गोलंदाजांनी चक्क खोटे असल्याचे शाबित केले. कारण देखील तसेच आहे. सनरायझर्स संघाला सुरुवातीला सोप्पे वाटणारे १६३ धावांचे आव्हान कठीण ठरवले ते याच गोलंदाजांनी. १९.४ षटकातच हैद्राबादचा संघ या गोलंदाजांसमोर पुरता नतमस्तक झाला आणि थोड्याफार नव्हे तर चक्क १० धावांनी राॕयल चॕलेजंर्स, बंगलोर संघाने ‘राॕयल’ विजय मिळवत त्यांची यंदाच्या आयपीएल मोसमाची यशस्वी मोहीम सुरु केली. जाॕन बेअरस्टो, मनिष पांडे आणि प्रियम गर्ग यांच्या खेरीच कुणालाही दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही हे आजच्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या पराभवाचे मुळ कारण म्हणावे लागेल.
यंदाच्या आयपीएलचा पुढचा साखळी सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाईल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने याआधीच मुंबई इंडियन्सचा पराभव करून स्वतःला सिद्ध केले आहे. राजस्थान रॉयल संघात खूप मोठे चेहरे नाहीत. कर्णधार स्टीव स्मिथ, बेन स्ट्रोक आणि जोफ्रा आर्चर ही मोजकीच नावे या संघात आहेत. परंतु, झटपट क्रिकेटमध्ये सामन्याबद्दल भाकीत करता येत नाही हे देखील ध्यानात ठेवावे लागेल. हा सामना शारजा क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर काळ्या यादीत टाकल्या गेलेल्या या मैदानावर भारतीय संघाने सन २००० नंतर क्रिकेट खेळलेले नाही.