नवी दिल्ली – विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता प्रवाशांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. हवाई प्रवासाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचा प्रवास रद्द होऊ शकतो.
त्यामुळेच हवाई नागरी संचालनालयाने (डीजीसीए) जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचना जाणून घेऊयात.
तर लागू शकतो निर्बंध
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हवाई नागरी संचालनालयाने अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. जर प्रवासी नियमांचे सारखे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्या प्रवासावर मोठा काळ प्रतिबंध लागू शकतो.
सर्वप्रथम मास्क
सर्वात प्रथम तुम्ही मास्क वापरणे विसरू नका. विमानतळ परिसरात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत मास्क वापरणे अनिवार्य आहे. हवाई प्रवासादरम्यान शारिरीक अंतर राखणे आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास विमानातून उतरवूनही दिले जाऊ शकते. त्यासोबतच नियमांचे अनेक वेळा उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला उपद्रवी प्रवासी घोषित केले जाणार आहे.
उपद्रवी प्रवासीचा धब्बा
हवाई प्रवासादरम्यान मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे. विशेष संकट किंवा असाधारण परिस्थिती नसेपर्यंत प्रवासी चेहऱ्यावरील मास्क काढू शकणार नाही. प्रवेशापूर्वी प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही यावर विमानतळावरील जवान लक्ष ठेवणार आहेत. मास्क व्यवस्थित घातला आहे की नाही यावर विमानतळ अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.
कायदेशीर कारवाई
विमानात जर कोणत्याही प्रवाशाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विमान उड्डाणापूर्वी अंतिम इशारा देऊनही मास्क वापरणार नसेल तर त्याला विमानातून उतरवून देण्यात येणार आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशासोबत उपद्रवी प्रवाशासारखी वागणूक दिली जाईल. उपद्रवी प्रवाशांच्या हवाई प्रवासावर बंदी लावली जाईल. नव्या नियमांनुसार, हे निर्बंध सहा महिने, एक वर्ष किंवा दोन वर्षांसाठी लागू होतील.